ई-पास हवाच; ८० लोकांना सीमेवरून पाठविले परत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:26 AM2021-04-26T04:26:26+5:302021-04-26T04:26:26+5:30
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याला लागून दोन राज्यांच्या सीमा आहेत. मध्यप्रदेश व छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमेला लागून गोंदिया जिल्ह्याची ...
गोंदिया : गोंदिया जिल्ह्याला लागून दोन राज्यांच्या सीमा आहेत. मध्यप्रदेश व छत्तीसगड या दोन राज्यांच्या सीमेला लागून गोंदिया जिल्ह्याची सीमा असल्याने १० दिवसांपूर्वीच या दुसऱ्या राज्यातून गोंदिया जिल्ह्यात येणाऱ्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. तरीदेखील ग्रामीण भागातील छोट्या-छोट्या रस्त्यांवरून दुसऱ्या राज्यातील लोक गोंदिया जिल्ह्यात येत आहेत. गोंदिया शहरातही इतर तालुक्यांतील लोक येऊ नये यासाठी प्रत्येक तालुक्याच्या मुख्य मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला. पोलीस नाकाबंदी करून येणाऱ्या-जाणाऱ्यांची सखोल चौकशी करीत आहेत. तरीदेखील पोलिसांची नजर चुकवून ५ ते १० कि.मी. अंतर अधिकचे कापून ग्रामीण भागातून लोक गोंदिया शहरात प्रवेश करीत आहेत. पोलिसांसमोर योग्य कारण घेऊन न येणाऱ्यांना सीमेवरूनच परत पाठविण्यात आले आहे. अवघ्या चार दिवसांत गोंदिया शहराच्या सीमेवरून योग्य कारण न सांगणाऱ्या किंवा ई-पास नसलेल्या ८० लोकांना परत पाठविण्यात आले आहे.
.............
चार सीमा; २० कर्मचारी
१) गोंदिया शहरात विनाकारण कुणीही येऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त मुख्य रस्त्यावर शहर सुरू होण्यापूर्वी नेमण्यात आला. प्रत्येक सीमेवर पोलिसांचा चोख बंदोबस्त राहत असून, ई-पासशिवाय कुणाला एन्ट्री नाही.
२) प्रत्येक पॉइंटवर जिल्हा वाहतूक शाखा व संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, असे एकूण पाच कर्मचारी प्रत्येक पॉइंटवर तैनात करण्यात आले आहेत.
३) चार ठिकाणी नाकाबंदी करून त्या चारही ठिकाणी पोलिसांची तैनाती २४ तास आहे. राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या असून, ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत या सीमा आहेत त्या पोलीस ठाण्यातील पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
........
कारंजा
- सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव व गोरेगाव या तालुक्यांतून गोंदियात विनाकारण कुणी प्रवेश करू नये यासाठी कारंजा येथे नाकाबंदी करण्यात आली आहे. या नाकाबंदीदरम्यान पोलीस तपासणी करीत आहेत.
.....
पतंगा मैदान
- जिल्हा परिषदेसमोरील पतंगा मैदानावरील सारस चौकात तपासणी नाका सुरू करण्यात आला. या नाक्यावर वाहतूक पोलीस व गोंदिया ग्रामीण पोलीस मिळून नाकाबंदी करतात. देवरी, आमगाव, सालेकसा या तालुक्यांतून गोंदियात येणाऱ्यांची चौकशी केली जाते.
......
कुडवा चौक
या चौकात तिरोडा तालुक्यातील व गोंदिया तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोकांना तपासण्यासाठी या ठिकाणी रामनगर व वाहतूक पोलीस मिळून नाकाबंदी करतात. विनाकारण येणाऱ्या किंवा सबळ कारण सांगितल्याशिवाय कुणालाच एन्ट्री द्यायची नाही यासाठी तपासणी मोहीम सुरू केली आहे.