पुढच्या वर्षी लवकर या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 12:41 AM2017-09-06T00:41:12+5:302017-09-06T00:41:29+5:30

मागील दहा ते बारा दिवस गणेशोत्सवामुळे मंगलमय आणि भक्तीमय वातावरण होते. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात आणि पुष्प वर्षाव करित ‘गणपती बाप्पा मोरया...’

Early next year ... | पुढच्या वर्षी लवकर या...

पुढच्या वर्षी लवकर या...

Next
ठळक मुद्देगणरायाला दिला निरोप : सकाळपासूनच गणपती विसर्जनाला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील दहा ते बारा दिवस गणेशोत्सवामुळे मंगलमय आणि भक्तीमय वातावरण होते. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात आणि पुष्प वर्षाव करित ‘गणपती बाप्पा मोरया...’ च्या जयघोषात पुढच्या वर्षी येण्याचे साकडे घालत सर्वांनी आपल्या लाडक्या बाप्पाला मंगळवारी (दि.५) निरोप दिला. विसर्जनाला सुरूवात झाल्याने शहरात सर्वत्र गणपतीच्या मिरवणुका दिसत होत्या.
विघ्नहर्ता व मांगल्याच्या देवताच्या उत्सवाची परिसरासह लगतच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांत ख्याती आहे. त्यात शहरातील गणपती उत्सवाची बात काही औरच आहे. येथील काही मोठ्या मंडळांकडून साजरा करण्यात येणारा उत्सव शहराची शानच आहे. त्यामुळे बाहेरगावहून भाविक शहरातील उत्सव बघण्यास येतात. २५ आॅगस्ट रोजी मोठ्या थाटात गणरायांची स्थापना करण्यात आली होती. गणपतीच्या उत्सवाचे हे दिवस नवचैतन्याचेच असतात. त्यामुळेच हे १२ दिवस भुर्रकन निघून गेले व अखेर दिवस उजाडला तो लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा. मंगळवारी सकाळपासूनच गणपती विसर्जनाला सुरूवात झाल्याचे चित्र होते. कुणी हातात, कुणी डोक्यावर, कुणी हातठेल्यांवर, कुणी रिक्शात तर कुणी चारचाकी वाहनांत गणरायांना घेऊन विसर्जनासाठी नदी व तलावांवर जात असल्याचे चित्र होते. यात गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणूका आकर्षणाचे केंद्रच होत्या. ढोलताशांवर नाचत गात तरूणाई गुलाल उधळत ‘गणपती बाप्पा मोरया... ’चा जयघोष करीत जात असल्याचे दिसून आले. मागल्यांचे देवता गणपती यंदा १२ दिवस आपल्या घरात विराजमान असल्याने त्यांना सहाजीकच भारी मनाने निरोप देण्यात आला. मात्र पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रणही बाप्पांना देण्यात आले.
प्रथमच डिजेविना विसर्जन
शासनाने डिजे वाजविण्यावर बंदी घातली आहे. नियमांचे पालन करुन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला शहरातील व जिल्ह्यातील गणेश मंडळांनी साथ देत डिजेचा वापर टाळीत ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढून गणेश विसर्जन केले.
मंगळवारी सर्वाधिक विसर्जन
व्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून मंडळांना विसर्जनासाठी दिवस वाटून देण्यात आले आहेत. त्यानुसार २ तारखेपासूनच विसर्जनाला सुरूवात झाली आहे. तर शेवटचे विसर्जन ९ तारखेला होणार असल्याचे दिसून येत आहे. यात मात्र मंगळवारी (दि.५) सर्वाधिक विसर्जन करण्यात आले. शहर पोलिसांनी ४८ मंडळांना तर रामनगर पोलिसांनी २० मंडळांना विसर्जनाच्या तारखा दिल्या होत्या. शिवाय हजारोंच्या संख्येत खाजगी गणपतींचे विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे, गणपती विसर्जनाच्या तारखांना घेऊन पोलीस विभागाकडून शेवटचा दिवस कोणता हे कळले नाही. तर रामनगर पोलिसांकडून ठरवून दिलेल्या तारखांबाबत संभ्रम होता.
विसर्जनस्थळांवर गर्दी
शहरातील पांगोली नदी छोटा गोंदिया- खमारी, सरकारी तलाव, साई मंदिर नाग तलाव, रजेगाव घाट, छोटा गोंदिया देवतलाव येथे मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाते. त्यामुळे या विसर्जन स्थळांवर एकच गर्दी दिसून आली. शहरात हजारोंच्या संख्येत खाजगी गणपतींची स्थापना केली जात असल्याने त्यात सार्वजनिक मंडळांची भर पडत असल्याने विसर्जन स्थळांवर भाविकांची एकच गर्दी दिसून आली.
शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त
विसर्जनाला सुरूवात झाली असून सुरक्षा व व्यवस्थेच्या दृष्टीने शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला. बंदोबस्तांतर्गत चौकाचौकांत पोलीस कर्मचाºयांची ड्यूटी लावण्यात आली होती. यासह वाहतूक पोलीसही त्यांच्या सोबत होते. तसेच विसर्जन स्थळांवरही पोलिसांसह होमगार्डचा बंदोबस्त होता. याशिवाय पेट्रोलींग पथक व पोलीस निरीक्षकांचे पथक सुद्धा नजर ठेऊन होते.

Web Title: Early next year ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.