‘हरविणे सोपे तर जिंकणे कठीण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 09:12 PM2018-04-09T21:12:25+5:302018-04-09T21:12:25+5:30
कुणाला हरविणे खूप सोपे आहे, पण कुणाला जिंकणे खूपच कठीण आहे. म्हणजेच कुणालाही हरविण्याचा उद्देश न ठेवता त्याला जिंकून पुढे जाण्याचा उद्देश ठेवावा, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या (नवी दिल्ली) सुप्रीमो डॉ. लता महतो यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोठणगाव : कुणाला हरविणे खूप सोपे आहे, पण कुणाला जिंकणे खूपच कठीण आहे. म्हणजेच कुणालाही हरविण्याचा उद्देश न ठेवता त्याला जिंकून पुढे जाण्याचा उद्देश ठेवावा, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या (नवी दिल्ली) सुप्रीमो डॉ. लता महतो यांनी केले.
येथील दुर्गा चौकातील सांस्कृतिक भवनात स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा रविवारी (दि.८) घेण्यात आला. यात त्या अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन करीत होत्या.
पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी नारायण जमईवार, सरपंच जिजा चांदेवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र कोडापे, संस्थाध्यक्ष राजहंस ढोके, उमेदचे कार्यकर्ते व महिला बचत गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. महतो पुढे म्हणाल्या, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने वीस कलमी कार्यक्रम बेरोजगारीचा दर कमी करण्यासाठी तयार केला आहे. यामध्ये परंपरागत कलागुणांचा विकास करणे, त्यात उत्पादित मालासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, शिका व कमवा, वुमन हेल्पलाईन सेंटर, उज्ज्वला योजना, राज्य, जिल्हा व तालुका स्थळावर महिला शक्ती केंद्र, शेतकऱ्यांसाठी कृषी विकास योजना आदी योजनांचा समावेश आहे, असे सांगून त्यांनी स्वच्छ भारत स्वच्छता मिशनची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केल्याचे सांगितले.
स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन श्रीशंकर बाबा सेवा प्रतिष्ठान (पुणे) व इटियाडोह जलाशय मत्स्यव्यवसाय विकास संस्था (रामनगर) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. यात झाशीनगर, तिडका, येरंडी, दर्रे, पवनीधाबे, जब्बारखेडा, जांभळी, येलोडी, गोठणगाव, संजयनगर, रामनगर, बोंडगाव, सुरबन, गंधारी, जांभळी, प्रतापगड, कढोली येथील महिला बचत गट व उमेदचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. प्रास्ताविक मांडून संचालन करीत आभार संस्थाध्यक्ष राजहंस ढोके यांनी मानले. यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला.