गूळ-शेंगदाणे खा आणि हिमोग्लोबिन झटपट वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 05:00 AM2021-10-08T05:00:00+5:302021-10-08T05:00:16+5:30
कुटुंबाच्या गरजांची पूर्तता करताना महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असून याचे परिणाम मात्र त्यांना भोगावे लागतात. हेच कारण आहे की, सर्वप्रथम महिलांमध्ये हिमोग्लोबिनच्या कमतरतेची समस्या जाणवते. मासिक पाळीतून अतिरक्तस्त्राव, खान-पानाकडे दुर्लक्ष, गरोदरपणात पोषक आहार न घेणे आदी कारणांमुळे महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होते. अशात महिलांमध्ये कमजोरी, चिडचिडेपणा, शरीरावर पांढरेपणा आदी लक्षणे दिसून येतात.
कपिल केकत
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आज महिला पुरुषांच्या बरोबर आली असून सर्वच क्षेत्र गाजवत असून, कशा प्रकारेही कमी नाही. असे असतानाही महिला कुटुंबाचा सांभाळ करताना स्वत:ला हरवून बसते, हे सुद्धा तेवढेच सत्य आहे. कुटुंबाच्या गरजांची पूर्तता करताना महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असून याचे परिणाम मात्र त्यांना भोगावे लागतात. हेच कारण आहे की, सर्वप्रथम महिलांमध्ये हिमोग्लोबिनच्या कमतरतेची समस्या जाणवते. मासिक पाळीतून अतिरक्तस्त्राव, खान-पानाकडे दुर्लक्ष, गरोदरपणात पोषक आहार न घेणे आदी कारणांमुळे महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण होते. अशात महिलांमध्ये कमजोरी, चिडचिडेपणा, शरीरावर पांढरेपणा आदी लक्षणे दिसून येतात. अवघ्या कुटुंबाचा सांभाळ महिलांच्या खांद्यावर असल्याने महिलांनी वेळीच सावध होऊन आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
हिमोग्लोबिनचे प्रमाण किती हवे?
n शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण ग्राम परसेंटमध्ये मोजले जात असून ते कमी झाल्यास शरीरावर त्याचे काही परिणाम लगेच जाणवतात.
nभारतातील महिलांमध्ये किमान ११ ग्राम परसेंट हिमोग्लोबिन असणे गरजेचे असून ते कमी झाल्यास महिलांना त्रास जाणवतो.
कारणे काय?
खानपानाकडे लक्ष न देणे, मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव होणे, सिकलसेल व थॅलिसिमिया यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. असे असल्यास महिलांमध्ये कमजोरी, चिडचिडेपणा, भोवळ येणे तसेच शरीर पांढरे दिसणे आदी लक्षणे दिसून येतात.
पालेभाज्या खा, हिमोग्लोबिन वाढवा
शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण ठरवून देण्यात आले असून महिलांमध्ये किमान ११ ग्राम परसेंट असणे गरजेचे आहे. यासाठी पालेभाज्या, फळांमध्ये सफरचंद, अंगूर, पेंडखजूर, अंजिर, बीट आदींचे नियमित सेवन करावे. तसेच गूळ-शेंगदाण्याचे सेवन केल्यानेही हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढविता येते.
वेळीच लक्ष द्या
मासिक पाळीत अतिरक्तस्त्राव, खानपानाकडे दुर्लक्ष व गरोदरपणात पोषक आहार न घेणे यामुळे महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. याचे परिणाम होणाऱ्या बाळावरही होतात. याकरिता महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. लक्षणे दिसताच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. निर्मला जयपुरिया, स्त्रीरोगतज्ज्ञ
इच्छा असूनही रक्तदान करता येईना
महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता हे कारण त्यांना इच्छा असूनही रक्तदानापासून लांब ठेवते. कारण महिलांमध्ये किमान १२.५ ग्राम परसेंट हिमोग्लोबीन असणे गरजेचे आहे. याशिवाय रक्तदानासाठी इच्छुक महिलेला थायरॉईड, बीपी, शुगर, मासिक पाळी आहे काय, हे सर्व विचारून तसेच वैद्यकीय चाचणी केल्यानंतरच रक्त घेतले जाते.
- नितीन रायकवार, तंत्रज्ञ, लोकमान्य रक्तकेंद्र
बहुतांश महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असते व यामुळे त्यांना रक्तदान करता येत नाही. महिलांमध्ये किमान १२.५ ग्राम परसेंट हिमोग्लोबिन व किमान वजन ५० किलो असणे गरजेचे आहे. याशिवाय आवश्यक त्या अन्य चाचण्या केल्या जातात व त्यानंतरच रक्त घेतले जाते. यामुळेच महिलांचे रक्त कमी प्रमाणात घेतले जाते.
- डॉ. सुवर्णा हुबेकर, निवासी वैद्यकीय अधिकारी, केटीएस रुग्णालय