प्रकल्पात शिक्षण विभागाचा अडथळा
By admin | Published: September 10, 2014 11:48 PM2014-09-10T23:48:47+5:302014-09-10T23:48:47+5:30
जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी व त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी गावची-शाळा आमची शाळा हा प्रकल्प शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे
सालेकसा : जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी व त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी गावची-शाळा आमची शाळा हा प्रकल्प शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे शिक्षणासंबंधीच्या सर्व तक्रारींचे समाधान करण्यात येणार आहे. पण ज्या शिक्षण विभागाद्वारे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे, तेच बेजबाबदारीने वागून या प्रकल्पात अडथळे निर्माण करीत आहेत.
पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी हे पद अनेक महिन्यांपासून रिक्त आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकारी हे पद खंडविकास अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले होते. आता नवीन गटशिक्षणाधिकारी येणार अशी चर्चा आहे. शिक्षण विभागातील कर्मचारीमंडळी कार्यालयीन वेळेत पूर्णवेळ राहत नाही. शिक्षक मंडळी अप-डाऊन करुन शाळेत वेळेवर पोहोचत नाही. कार्यालयीन कामाच्या नावावर सुट्या मारण्यात त्यांना धन्यता वाटते. शिक्षकांचे दोन-दोन महिने पगार होत नाही. त्यामुळे त्यांना मानसिक त्रासही होत असतो. पगार झाले तर बँकेची लिंक फेल असते. त्यासाठी शिक्षकांना शाळा सोडून बँकेच्या चकरा माराव्या लागतात. काही शाळेतील शिक्षक नेहमी गैरहजर असून अजूनही त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई झाली नाही. या सर्व कारणांमुळे मुलांच्या शैक्षणिक कार्यावर परिणाम होत आहे. सकाळ पाळीत काही शिक्षक बाहेर गावावरुन येणारे सकाळी ८ वाजतानंतर शाळेत पोहोचून आपले प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत असतात. जेव्हा की सकाळपाळीत ७.३० वाजता येणे आवश्यक आहे.
या प्रकारामुळे गावची शाळा आमची शाळा हा प्रकल्प अडचणीत आला आहे. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचे दोन पद रिक्त आहेत. या प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी काम करण्याची कर्मचाऱ्यांची मानसिकता नाही. काही शिक्षकांना हा उपक्रम म्हणजे गळ्यात लोंढणे वाटते. आदिवासी, नक्षलग्रस्त क्षेत्रात काम करताना नक्षलभत्ता घेताना आदिवासी मुलांसाठी जास्त वेळ शिक्षण देताना दिसत नाही. तर त्यांच्या शिकविण्याच्या अधिकृत वेळेतही शिक्षक चाट मारत असतात. त्यामुळे ‘गावची शाळा आमची शाळा’ हा शिक्षण विभागातील कर्मचारी व शिक्षकांमुळे अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)