शिक्षणाधिकाऱ्यांची शाळा तपासणी मोहीम
By admin | Published: August 21, 2014 11:57 PM2014-08-21T23:57:42+5:302014-08-21T23:57:42+5:30
शालेय प्रशासनात पारदर्शकता यावी, शैक्षणिक कार्यात सुधारणा व्हावी, शिक्षकांच्या कार्यात नियमितता असावी, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्ज्यात सुधारणा व्हावी या उद्देशातून तिरोड्याच्या गट
काचेवानी : शालेय प्रशासनात पारदर्शकता यावी, शैक्षणिक कार्यात सुधारणा व्हावी, शिक्षकांच्या कार्यात नियमितता असावी, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्ज्यात सुधारणा व्हावी या उद्देशातून तिरोड्याच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या सहयोगी ताफ्यासह शाळांना अचानक भेटी देण्याची मोहीम सुरू केली आहे. आजपर्यंत अनेक शाळांना भेटी देवून तपासणी करण्यात आल्याचे संबंधितांनी सांगितले आहे.
तालुक्याच्या करटी केंद्रांतर्गत बेरडीपार शाळेत गटशिक्षणाधिकारी यांनी अचानक भेट दिली. गटशिक्षणाधिकारी सकाळी ९.३० वाजता शाळेत दाखल झाले. यानंतर दोन शिक्षण विस्तार अधिकारी, पाच विषयतज्ञ, एक गटसमन्वयक, एक केंद्रप्रमुख आणि अन्य एक शिक्षक उपस्थित झाले. मात्र १०.१५ वाजता शिक्षक उपस्थित झाले नसल्याने गटशिक्षणाधिकारी मांढरे यांनी शालेय मुलांची प्रार्थना घेतली. सर्वच शिक्षक १०.२० वाजतानंतर उपस्थित झाल्याने गटशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांनी शिक्षकांना फटकारले आणि उपस्थिती रजिस्टरमध्ये स्वाक्षऱ्या करू दिल्या नाही.
मांढरे यांनी विषयतज्ज्ञ आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या माध्यमाने शाळेची तपासणी केली. तिसऱ्या व पाचव्या वर्गाची तपासणी विषयतज्ज्ञ ब्रजेश मिश्रा, सहाव्या वर्गाची तपासणी शिक्षण विस्तार अधिकारी डी.बी. साकुरे यांनी केली. पोषण आहार, शालेय रेकॉर्डची तपासणी शिक्षण विस्तार अधिकारी पी.पी. समरीत यांनी केली. गटशिक्षणाधिकाऱ्यांना तपासणी अहवाल दिल्यानंतर वर्गवार माहिती जाणून घेतली आणि ज्यात उणीवा दिसून आल्या त्यात तातडीने सुधारणा करण्यात यावे, असे बजावून सांगितले.
शासन शिक्षणावर सर्वाधिक निधी खर्च करतो. शिक्षकांना भरपूर वेतन दिल्या जाते. त्यामुळे शिक्षकांनी आपली जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडून शैक्षणिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिला. प्रत्येक शिक्षकाची वेळ ठरवून दिलेली आहे. वेळेचे भान ठेवून शाळेत वेळेवर उपस्थित राहण्याचे सांगितले. कामात कामचुकारपणा करणाऱ्या शिक्षकांना धारेवर धरण्यात येईल, असेही गटशिक्षणाधिकाऱ्यांनी बजावले.
शाळा तपासणी मोहिमेत गटशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांच्याशिक्षण विस्तार अधिकारी पी.पी. समरीत, डी.बी. साकुरे, गटसमन्वयक खोब्रागडे, केंद्रप्रमुख आर.बी. दास, विषयतज्ज्ञ ब्रजेश मिश्रा, पी.एस. ठाकरे, एस.पी. कुंजरकर आणि पी.एस. लांडगे उपस्थित होते. (वार्ताहर)