प्रोजेक्टरवर शिक्षण देणारी शाळा बोदलबोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 06:00 AM2019-12-29T06:00:00+5:302019-12-29T06:00:18+5:30
वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याला बोलण्याचे स्वातंत्र्य असून ज्ञानरचनावादी साहित्याने कृतीयुक्त अध्यापन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यात आनंद वाटतो. विद्यार्थ्याची क्षमता ओळखून विद्यार्थ्याच्या अध्ययन निष्पतीनुसार प्रत्येक वर्गात भाषा, इंग्रजी, गणित व विज्ञान पेटीतील साहित्याचा वापर केला जातो. त्यामुळे अध्यापन प्रक्रिया ही रंजक झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्याच्या दुर्गम भागात असलेल्या बोदलबोडी शाळेत इयत्ता १ ते ८ वर्ग असून चार वर्गात स्मार्ट टीव्ही लावलेल्या आहेत. एका वर्गात प्रोजेक्टरद्वारे अध्यापन केले जाते. प्रत्येक दिवशी आळीपाळीने सर्व वर्गाना दिक्षा अॅपच्या माध्यमातून अध्ययन अनुभव दिले जातात. विशेष म्हणजे प्रत्येक मंगळवारला दिक्षा अॅप दिन साजरा केला जातो.हे सर्व साहित्य लोकसहभागातून उभारण्यात आले आहेत.
वर्गात प्रत्येक विद्यार्थ्याला बोलण्याचे स्वातंत्र्य असून ज्ञानरचनावादी साहित्याने कृतीयुक्त अध्यापन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यात आनंद वाटतो. विद्यार्थ्याची क्षमता ओळखून विद्यार्थ्याच्या अध्ययन निष्पतीनुसार प्रत्येक वर्गात भाषा, इंग्रजी, गणित व विज्ञान पेटीतील साहित्याचा वापर केला जातो. त्यामुळे अध्यापन प्रक्रिया ही रंजक झाली आहे. यासाठी प्रत्येक गुरुवारी साहित्य वापर दिन साजरा करण्यात येतो. गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे याकरीता इयत्ता ५ वीला जवाहर नवोदय विद्यालयाचे वर्ग घेतात. त्यामुळे विद्यार्थी अधिक गुणवान व हुशार होत आहेत. तसेच इयत्ता ५ वी व ८ वी ला स्कॉलरशीपचे वर्ग घेतले जातात. विद्यार्थ्याना व्यवहारीक ज्ञान प्राप्त व्हावे, भौगौलिक व ऐतिहासीक स्थळाची माहिती मिळावी यासाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्याच्या सुप्तगुणांना चालना मिळावी याकरीता दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांची प्रगती पालकांना माहिती व्हावी, यासाठी व्हाट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्याचा गृहकार्य, पालक सभा व शाळेतील विविध उपक्रमाचे आयोजन यांचे आदान-प्रदान या ग्रुपद्वारे केले जाते. दोन दिवस इंग्रजी, दोन दिवस हिंदी व दोन दिवस, मराठी असे तीन भाषेत परिपाठ सादर केला जातो. परिपाठात सामान्यज्ञान व इंग्रजी विषयाला विशेष महत्त्व दिला जाते. दररोज पाच प्रश्न व दररोज पाच इंग्रजी शब्द सादर केले जातात. तारीखवार पाढा सादर केला जातो.
विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. त्यांच्याकडून वाढदिवसानिमित्त झाड लावून त्याला जगविणयचा संकल्प घेण्यात येतो. परिसर हिरवेगार करण्यासाठी परसबाग निर्माण करण्यात आली आहे. शाळेत घंटा वाजविली जात नाही. विद्यार्थ्याना अध्यापन करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती गुणवत्ता शिष्यवृत्ती, सुवर्ण जयंती शिष्यवृत्ती व अन्न विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्याना दिले जाते. उत्कृष्ठ शाळा उभारणीसाठी मुख्याध्यापक एम.एल.कटरे, शिक्षक पी.बी.हटवार, आर.एस.हेमने, जे.वाय.रहांगडाले, ए. पी.बोरकर, वाय.सी.राऊत, एस. के. भोंडवे यांनी प्रयत्न केले आहेत.
नावीन्यपूर्ण विज्ञान केंद
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळेत आधुनिक नाविण्यपूर्ण विज्ञान केंद्र उपलब्ध झाल्याने विद्यार्थी स्वत: नवनवीन मॉडेल तयार करतात.यासाठी शाळास्तरावर विज्ञान प्रदर्शनी आयोजित केली जाते. यामुळे तालुकास्तरावर विद्यार्थी अतिशय गुणवत्तापूर्ण मॉडेल तयार करीत आहेत. प्रदर्शनीत क्रमांक घेऊन या शाळेचे मॉडेल जिल्हास्तरवर जात आहेत.
सुसज्ज आयसीटी लॅब
लोकसहभागातून ७ हजार ५०० रुपये खर्च करुन सत्र २०१८-१९ मध्ये संगणकाच्या मदतीने एक आयसीटी लॅब तयार करण्यात आली. आयसीटी लॅबच्या मदतीने विद्यार्थी विज्ञान तंत्रज्ञानाचे धडे घेऊन आपली प्रगती साधत आहेत.
सुसज्ज ग्रंथालय
विद्यार्थ्याना वाचनाची आवड निर्माण व्हावी व वाचन संस्कृतीचा विकास व्हावा यासाठी शाळेत सुसज्ज असे ग्रंथालय निर्माण करण्यात आले आहे. ग्रंथालयातील विविध पुस्तके व मासीके यांचे वाचन विद्यार्थी करतात.
विद्यार्थी बचत बँक
विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी तसेच सुजान नागरिक घडावे यादृष्टीने शाळेत विद्यार्थ्याची दैनिक बचत बँक तयार करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी १ ते १.५० लाखापर्यंत वार्षिक उलाढाल बँकेत केली जाते. आर.एस.हेमने यांच्या मार्गदर्शनात बँकेचा व्यवहार करतात. रक्कम जमा करणे, विड्राल फार्म ने विड्राल देणे, कॅशबुक मध्ये नोंदी करणे ह्या कृती स्वत:च करतात.
साहित्य निर्मिती कार्यशाळा
शाळेत विद्यार्थ्याना विविध उत्पादक उपक्रमांची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या कलागुणांच्या विकासासाठी विशेष प्रसंगावर साहित्यनिर्मिती कार्यशाळेचा आयोजन केले जाते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी निर्माण करणे, दिवाळीच्या प्रसंगानुसार आकाश कंदील तयार करणे, विविध दिनविशेषचा औचित्य साधून पुष्पगुच्छ तयार करते, वेशभूषा करणे यासारख्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात व कला व कार्यानुभावाचे संपूर्ण विभाग जे.वाय.रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात राबवले जाते.