नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण टॅबवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 06:00 AM2019-12-16T06:00:00+5:302019-12-16T06:00:09+5:30
गाव आदिवासींचे असून डोंगराने वेढलेले, घनदाट जंगल, अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त आहे. गावात जायला पक्के रस्ते नाहीत. गावातील बोलीभाषा छत्तीसगडी व गोंडी आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही या गावातील शाळेला फुलविण्याचे काम रमेश बोरकर व सदाशिव पाटील या कर्तृत्ववान शिक्षकांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नवनवीन तंत्रज्ञानाची दररोज भर पडत असून जीवनच काय शिक्षणही डिजिटल होत चालले आहे. यातूनच विद्यार्थीही आता फळ््यावरील शिक्षणासह टॅबवर शिक्षण घेऊ लागले आहेत.
विशेष म्हणजे, शहरात हे सुरू असताना जंगलात वसलेल्या नक्षलग्रस्त संवेदनशील येडमागोंदी गावातील शाळेतही हे चित्र बघावयास मिळत आहे. येथील ३० विद्यार्थी टॅबवर शिक्षण घेत आहेत.
महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याच्या सिमेला लागून गडचिरोली जिल्ह्यापासून २ किमी. अंतरावरील व गोंदियापासून १२० किमी. अंतरावर डोंगराच्या कुशीत येडमागोंदी हे गाव वसलेले आहे. ४०० लोकसंख्या असलेले छोटेशे गाव गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात मिसपिरी केंद्रात येते. हे संपूर्ण गाव आदिवासींचे असून डोंगराने वेढलेले, घनदाट जंगल, अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त आहे. गावात जायला पक्के रस्ते नाहीत. गावातील बोलीभाषा छत्तीसगडी व गोंडी आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही या गावातील शाळेला फुलविण्याचे काम रमेश बोरकर व सदाशिव पाटील या कर्तृत्ववान शिक्षकांनी केले.
कल्पनेला भरारीचे पंख देत त्यांनी विद्यार्थ्यांना उंच भरारी घेण्यासाठी तयार केले. यासाठी शिक्षकांना आधी विद्यार्थी व्हावी लागले. मूळात मराठी असलेल्या या शिक्षकांना आधी छत्तीसगडी भाषा शिकावी लागली व त्यांनी ती भाषा शिकून नंतर त्या विद्यार्थ्यांना मराठी शिकविली. ही सर्व किमया प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांच्या नेतृत्वात डॉ. किरण धांडे, सूचित्रा जाधव, संदिप सोमवंशी, दिलीप नवखरे, सुनील हरिणखेडे यांच्या मदतीने शक्य झाली. या लोकांनी या शाळेचा अध्ययनस्तर वाढविण्यासाठी शाळेला अनेक भेटी दिल्यात.
दोन शिक्षक असलेल्या येडमागोंदी शाळेत ३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विविध उपक्रम घेऊन सदाशिव पाटील नावाच्या शिक्षकाने रमेश बोरकर यांच्या मदतीने येथील विद्यार्थ्यांना मराठी व गणित विषयात प्रगत केले. ज्ञानरचनावाद पद्धतीने अध्ययन-अध्यापन केले जाते. विद्यार्थी स्वत: कविता व गोष्टी तयार करतात. या विद्यार्थ्यांची बोलीभाषा छत्तीसगडी व गोंडी असली तरी शाळेतील विद्यार्थी शिक्षकांच्या प्रभावामुळे मराठी भाषा बोलतात. या शाळेला आता मुकेश गणवीर व प्रशांत बडोले हे दोन शिक्षक चालवितात. परिणामी ही शाळा १०० टक्के प्रगत म्हणून नावारुपास आली.
‘जे राव न करे-ते गाव करे’ चा प्रत्यय येडमागोंदी या गावात आला. येथे पालक व शिक्षकांत उत्तम समन्वय आहे.
गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देऊन शाळा डिजीटल व टॅबयुक्त करण्यासाठी आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना सुद्धा पालकांनी ७० हजार रुपयांची शाळेला मदत केली. गावकरी व शिक्षकांनी मिळून डिजीटल, टॅबयुक्त व गुणवत्ता पूर्ण शाळा तयार केली. या शाळेतील विद्यार्थी टॅबचा वापर करतात.
विविध नवोपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तयार करण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न सुरु आहेत. अध्ययनस्तर वाढ या कृती कार्यक्रमामुळे आतापर्यंत ३०० च्या घरात शाळा शंभर टक्के पूर्ण झाल्या आहेत.
-राजकुमार हिवारे
प्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प. गोंदिया.
मोर पैसा, मोर बॅँक
विद्यार्थ्यांना बचतीचे महत्व कळावे तसेच बँकेचे व्यवहार समजावे या करीता शाळेत बचत बँक सुरु करण्यात आली. विद्यार्थ्याना ही बँक आपली वाटावी म्हणून बँकेला ‘मोर पैसा, मोर बॅँक’ हे नाव देण्यात आले.
आप की अदालत
छत्तीसगडी व गोंडी बोलीभाषा असलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाण मराठी भाषेत व्यक्त होता यावे, यासाठी शाळेत होणाºया वादविवादावर आधारीत विषय आप की अदालत या उपक्रमाच्या माध्यमातून सोडविले जातात. यामध्ये विद्यार्थी वादविवाद करतात. शिक्षक न्यायाधीशाची भूमिका बजावितात.
माझी अभ्यासिका
स्वयं अध्ययन व गटकार्य करण्यासाठी शालेय परिसरात विद्यार्थ्यांसाठी वाचनकुटी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्याचे ते छोटे अभ्यास केंद्र झाले आहे.
पक्ष्यांसाठी पाणपोई
विद्यार्थ्यांना पर्यावरण, वन्यजीव व वनसंपत्तींचे संवर्धन करण्यावर माहिती दिली जाते. विद्यार्थ्यांचे पक्ष्यांप्रती प्रेम वाढावे, यासाठी ऊन्हात उडणाऱ्या पक्ष्यांसाठी शाळेतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाणपोईतून करण्यात आली आहे.