शिक्षणाने आपण समाज व देशाचा विकास घडवू शकतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:11+5:302021-07-19T04:19:11+5:30
जिल्हा परिषद शाळेतील गुणवंतांचा केला सत्कार सौंदड : दहावीची परीक्षा शिक्षणाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक विद्यार्थी आपली ...
जिल्हा परिषद शाळेतील गुणवंतांचा केला सत्कार
सौंदड : दहावीची परीक्षा शिक्षणाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक विद्यार्थी आपली क्षमता सिद्ध करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतो. परीक्षेत यशस्वी होण्याचा आनंद हा निश्चितच मोठा असतो. कारण शिक्षणाने आपण समाज तसेच देशाचा विकास घडवू शकतो, असे प्रतिपादन सरपंच गायत्री इरले यांनी केले.
येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गंगाधर मारवाडे, प्राचार्य सुनील भीमटे, शिक्षक अनिल बोरकर, अनिल कापगते, जयपाल मोटघरे, स्वदीप रामटेके उपस्थित होते
परीक्षेस विद्यालयातील ५४ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी २८ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत, तर २६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. यात शुभांगी नामदेव गायधने हिने ९४ टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम, सुधांशू किशोर मदनकर याने ९४ टक्के गुण घेऊन दि्वतीय, तर केतन सुरेश सोनटक्के याने ९१ टक्के गुण घेत तृतीय क्रमांक पटकावला. त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मारवाडे यांनी, विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरची दिशा ठरवून त्यादृष्टीने पाऊल टाकण्याची ही पहिली संधी असते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी पुढील वर्गात प्रवेश घेताना आपल्या आवडीची शाखा निवडावी. शैक्षणिक प्रगतीसोबतच कौशल्य विकास, खेळ-व्यायाम व व्यक्तिमत्त्व विकास याकडेही लक्ष द्यावे, असे सांगितले.
कार्यक्रमासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.