प्रशिक्षणातून उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 09:37 PM2017-12-10T21:37:55+5:302017-12-10T21:38:12+5:30
ग्रामीण भागातील युवकांनी केवळ कौशल्य विकास प्रशिक्षण देवून होणार नाही, तर त्यांना आर्थिक पाठबळ देवून त्यांना रोजगाराभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न आहे,
आॅनलाईन लोकमत
अर्जुनी-मोरगाव : ग्रामीण भागातील युवकांनी केवळ कौशल्य विकास प्रशिक्षण देवून होणार नाही, तर त्यांना आर्थिक पाठबळ देवून त्यांना रोजगाराभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न आहे, यासाठी आम्ही किमान १०० उद्योजक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात तयार करण्याचा डिक्कीसोबत करार केला आहे. ग्रामीण भागात कौशल्य विकास प्रशिक्षणातून उद्योजक उभे करण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), डी-गेन ग्रुप व एबी अँड सी स्किल अँड एज्युकेशन यांच्या माध्यमातून अनुसूचित प्रवर्गातील युवक व युवतींसाठी लॉजिस्टिक सेक्टर व जीएसटी अकांउंट क्षेत्रातील मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष रचना गहाणे होत्या. यावेळी पं.स.सभापती अरविंद शिवणकर, भाजपा तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे, गटविकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, खरेदी विक्र ी केंद्राचे अध्यक्ष नामदेव कापगते, ठाणेदार प्रशांत भस्मे, शिवनारायण पालीवाल, भाजप जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, माजी सभापती प्रकाश गहाणे, न.प.उपाध्यक्ष विजय कापगते, रघुनाथ लांजेवार, रामदास कोहाडकर, मुरलीधर ठाकरे, डि-गेनचे संचालक तुषार राठी, विनोद ठोंबरे, एबी अँड सीचे अक्षय बाहेती, नागपूर बार्टीच्या सहायक प्रकल्प संचालक नेहा ठोंबरे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलतांना पालकमंत्री बडोले यांनी, कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ९०० मुलींना प्रशिक्षित करून रोजगारभिमुख करण्यात आले आहे. बार्टीच्या माध्यमातून राज्यातील २० मुलींना एअरहोस्टेजमध्ये काम मिळाले आहे. आता आपले सर्व लक्ष ग्रामीण भगातील मुलांमुलींकडे असून त्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभे करणे आहे. राज्यात साडेबारा हजार बँक आहेत. एका बँकमधून मुद्रा योजनाच्या माध्यमातून २ उद्योजकांना आर्थिक सहाय्य मिळायला पाहिजे. म्हणजे २५ हजार उद्योजक उभे व्हायला पाहिजे. मात्र, बँकेच्या उदासिन धोरणामुळे राज्यात आतापर्यंत अनुसूचित जातीचे ५००, अनुसूचित जमातीचे १०० तर २७७४ महिला उद्योजक असे एकूण आतापर्यंत ३३७४ उद्योजक तयार झाले असल्याचे त्यांनी सांगीतले.
राज्यातील बेरोजगारीचे निर्मुलन झाले पाहिजे, असे सांगत नामदार बडोले यांनी, शिक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवक-युवतींना रोजगाराभिमुख करण्याचा आमचा प्रयत्न आहे. बार्टीच्या माध्यमातून २० टक्के ओबीसी युवक-युवतींनाही या प्रशिक्षणाचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देवून पुढील महिन्यात ४ ते ५ कोटींचे साहित्य दिव्यांगाना वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्तावीक झिल इन्फोटेकचे संचालक माणिक मेश्राम यांनी मांडले. संचालन प्रा. दिलीप काकडे यांनी केले. आभार तृप्ती मेश्राम यांनी मानले.