कचारगड देवस्थानचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:27 AM2021-05-22T04:27:27+5:302021-05-22T04:27:27+5:30
देवरी : जिल्ह्यातील आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या सालेकसा तालुक्यातील धार्मिक देवस्थान व तीर्थस्थळ कचारगड हे जगभरात प्रसिद्ध आहे. याठिकाणी ...
देवरी : जिल्ह्यातील आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या सालेकसा तालुक्यातील धार्मिक देवस्थान व तीर्थस्थळ कचारगड हे जगभरात प्रसिद्ध आहे. याठिकाणी पारी कोपार लिंगो व माँ काली कंकाली यांचे देवस्थान आहे. हे स्थळ आदिवासी समाजासह सर्व जाती, धर्म व समाजातील लोकांकरिता श्रद्धा व आस्थेचे केंद्र आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात येथे यात्रा भरते. त्यावेळी देशातून लाखोंच्या संख्येने भाविकांचे आगमन होते. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात येथे सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने भाविकांची गैरसोय होते. या क्षेत्राच्या सर्वांगिण विकासाच्या मुद्द्याला धरून आमदार सहषराम कोरोटे यांनी या देवस्थान व तीर्थस्थळाची दर्जा वाढ करून ‘अ’ वर्गाचे देवस्थान व पर्यटन स्थळ बनविण्याकरिता पुढाकार घेऊन प्रयत्न सुरू केले आहेत.
देवस्थान व तीर्थस्थळाचा दर्जा वाढविण्यासाठी आमदार कोरोटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन कचारगड देवस्थान व तीर्थस्थळाच्या भौगोलिक व मूलभूत सोयी-सुविधांबाबत चर्चा केली आणि या क्षेत्राच्या सर्वांगिण विकासाकरिता ५० कोटी रूपयांच्या निधीची मागणी केली.
आमदार कोरोटे यांच्या या प्रयत्नांमुळे पर्यटन विभाग, वित्त विभाग, ग्रामविकास विभाग यांच्यासह संबंधित सर्व विभागांकडून याविषयी कार्यवाही सुरू असून, याबाबतचे पत्र आमदार कोरोटे यांना प्राप्त झाले आहे. आमदार कोरोटे यांच्या प्रयत्नांमुळे आता कचारगड येथील देवस्थान व तीर्थस्थळाच्या पर्यटन दर्जात वाढ करून ‘अ’ वर्ग दर्जा प्राप्त होणार आहे.