रूग्णांना जीवनदायी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:22 AM2021-06-04T04:22:36+5:302021-06-04T04:22:36+5:30
गोंंदिया - कोरोनाच्या सुरूवातीलाच राज्य शासनाने विशेष निर्णय पारित करून राज्यातील प्रत्येकच खासगी रूग्णालयाला प्रत्येक नागरिकाला कोरोना उपचारासाठी महात्मा ...
गोंंदिया - कोरोनाच्या सुरूवातीलाच राज्य शासनाने विशेष निर्णय पारित करून राज्यातील प्रत्येकच खासगी रूग्णालयाला प्रत्येक नागरिकाला कोरोना उपचारासाठी महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत पात्र घोषित केले होते. त्यावरही खासगी रूग्णालयांनी आदेशाचे पालन न करता रूग्णांची लूट केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही मे २०२१ मध्ये याबाबतचे निर्देश राज्य शासनाला दिले होते. मात्र त्यानंतरही राज्य शासनाने अद्याप कुठलेही पाऊल उचलले नाही. अशात खासगी रूग्णालयात उपचार करवून घेतलेल्या रूग्णांना जीवनदायी योजनेंतर्गत १.५० लाख रूपयांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवून केली आहे.
ना. टोपे यांना पाठविलेल्या पत्रात अग्रवाल यांनी, कोरोना महामारीत जेव्हा शासकीय रूग्णालयांत जागा नव्हती तेव्हा कोरोनाबाधितांच्या परिवारांनी आपली आर्थिक स्थिती नसतानाही खासगी रूग्णालयात उपचार करविला. तेथेही ऑक्सिजन सिलिंडर व रेमडेसिविर इंजेक्शनसाठी काळाबाजार करणाऱ्यांनी या परिवारांकडून लाखो रूपये वसूल केले. यामुळे कित्येक परिवार आज अडचणीत आहेत. करिता या रूग्णांना जीवनदायी योजनेतून लाभ देण्यात यावा, अशी मागणी अग्रवाल यांनी केली आहे. यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनस्तरावर संघर्ष करण्याची तयारी अग्रवाल यांनी दर्शविली आहे.
-------------------------------
कागदपत्रांसह जनसंपर्क कार्यालयात संपर्क करा
कोरोना रूग्णांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अग्रवाल यांनी आता प्रयत्न करण्याची तयारी केली असून यासाठी कोरोनाबाधितांच्या कुटुंबीयांनी रूग्णालयाचे बिल, आरटी-पीसीआर रिपोर्ट, रेशनकार्ड, आधारकार्ड झेरॉक्ससह अग्रवाल यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क करावा असे भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष धनलाल ठाकरे व शहर अध्यक्ष सुनील केलनका यांनी कळविले आहे.