नक्षल्यांना शस्त्र पुरवठा करणाऱ्या आठजणांना पकडले ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:19 AM2021-07-09T04:19:36+5:302021-07-09T04:19:36+5:30
गोंदिया : नक्षलींना पुरवठा करण्यासाठी आणलेल्या शस्त्रांसह बालाघाट पोलिसांनी आठजणांना पकडले आहे. पकडण्यात आलेल्या या आठ आरोपींमध्ये गोंदियातील दोघांचा ...
गोंदिया : नक्षलींना पुरवठा करण्यासाठी आणलेल्या शस्त्रांसह बालाघाट पोलिसांनी आठजणांना पकडले आहे. पकडण्यात आलेल्या या आठ आरोपींमध्ये गोंदियातील दोघांचा समावेश असून त्यांनी मागील काही महिन्यांत कित्येकदा नक्षलींना शस्त्र पुरविल्याचे कबूल केले आहे. ही कारवाई बुधवारी रात्री (दि.७) करण्यात आली.
बालाघाटचे पोलीस अधीक्षक अभिषेक तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाघाट जिल्ह्यातील किरनापूर-किन्ही जंगलात नक्षलींना शस्त्रांचा पुरवठा करण्यासाठी फिरत असलेल्या आठजणांना पकडण्यात आले. त्यांंच्याकडून तीन पिस्टल व त्यांची तीन मॅग्जीन, एके-४७, जिलेटिनच्या आठ छडी, २० फीट तार, आठ मोबाईल, चारचाकी दोन वाहन, नऊ एलइडी टाॅर्च, छत्री, हवा पंप, एमपी थ्री प्लेयर, पर्स, सूटकेस, कपड्यांनी भरलेले तीन बॅग व टेंटचे सामान जप्त करण्यात आले आहे. ही आंतरराज्यीय टोळी राजस्थान, महाराष्ट्र व मध्य प्रदेशात शस्त्रांची खरेदी-विक्री करीत होती. या कारवाईनंतर आता मध्य प्रदेशातील नक्षलींना शस्त्र पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये संजय चित्रोढ़ा (रा. ठाणे, महाराष्ट्र), रोहित वुटाने (रा. ठाणे), घनश्याम आचले (रा. गोंदिया), विजय कोरेटी (रा. गोंदिया), शकील खान (रा. कोटा, राजस्थान), वाजिद तैथरी (रा. कोटा), तौसिफ (रा. झालावाड, राजस्थान) व जितेंद्र अग्रवाल (रा. झालावाड) यांचा समावेश आहे. या टोळीने मागील ६ महिन्यांत ३ राज्यांत नक्षलींना शस्त्र व अन्य सामानांचा पुरवठा केला आहे. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलींना पावसापूर्वी पाच हजार काडतूस, पिस्टल, अन्य शस्त्र, बारूद, शिबिर लावण्याचे साहित्य पुरविण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा सौदा झाला होता. यातील ३० लाख रुपयांचे सामान मागील ६ महिन्यांत देऊन झाले आहे.
----------------------
टेलरच्या माध्यमातून बनली लिंक
भोपाळ येथील पोलीस मुख्यालयात पोलीस महानिरीक्षक (एंटी नक्षल ऑपरेशन) साजिद फरीद शापू यांनी सांगितले की, या टोळीचा मास्टरमाईंड संजय आहे. तो पूर्वी मुंबई येथे ड्रग्स सप्लाय करीत होता. त्यानंतर त्याची ओळख गडचिरोली येथील टेलर रामदास सोबत झाली व तेथूनच तो घनश्यामच्या संपर्कात आला. घनश्याम नक्षलींचा गणवेश शिवण्याचे काम करीत असून त्याच्याच माध्यमातून संजयने नक्षल्यांना शस्त्र पुरविण्याची लिंक बनविली. आरोपी राजस्थान व अन्य काही ठिकाणांहून शस्त्र विकत घेत असून महाराष्ट्र व सेंधवा (जि. बडवानी, मध्य प्रदेश) होत मध्य प्रदेशात पोहोचवित होते. विशेष म्हणजे, ही टोळी महाराष्ट्रातील गोंदिया, गडचिरोली, छत्तीसगड राज्यातील कवर्धा व राजनंदागाव तसेच मध्य प्रदेश राज्यात सक्रिय सर्वच दलमला बालाघाट येथून शस्त्र पुरवठा करीत होते. यात ५०० काडतूसच्या सौद्याबाबत पोलिसांना भनक लागली होती.