आठ शाळा ठरल्या अनधिकृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 09:37 PM2018-05-15T21:37:19+5:302018-05-15T21:37:19+5:30
शासनाची परवनागी न घेता सर्रासपणे कारभार चालविणाऱ्या स्वयं अर्थसहाय्यीत शाळांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात गोंदिया जिल्ह्यातील आठ शाळा अनाधिकृत असल्याची बाब पुढे आली आहे. तर एका शाळेला परवानगी आहे किंवा नाही या संभ्रमात स्वत: शिक्षण विभाग आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शासनाची परवनागी न घेता सर्रासपणे कारभार चालविणाऱ्या स्वयं अर्थसहाय्यीत शाळांची तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात गोंदिया जिल्ह्यातील आठ शाळा अनाधिकृत असल्याची बाब पुढे आली आहे. तर एका शाळेला परवानगी आहे किंवा नाही या संभ्रमात स्वत: शिक्षण विभाग आहे.
शिक्षण हक्क कायद्यातील तरतूदीच्या कलम १८ नुसार कारवाई करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक पुणे यांनी दिले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील स्वयं अर्थसहाय्यीत ११६ शाळांची तपासणी करण्यात आली. वर्ग १ ते ५ व वर्ग १ ते ८ वी च्या स्वयं अर्थसहाय्यीत शाळा आहेत. त्या शाळांची तपासणी करण्यात आली. त्यात गोंदिया तालुक्यातील पाच शाळा, सडक-अर्जुनी, आमगाव व देवरी या तालुक्यातील प्रत्येकी एक शाळा अनाधिकृत असल्याचे या तपासणीत उघडकीस आले.
गोंदिया तालुक्यातील देवेंद्र प्राथमिक स्कूल अदासी-तांडा, दशमेश पब्लीक स्कूल हिवरा, बुध्दीष्ठ इंटरनॅशनल स्कूल घिवारी, मातोश्री शिशू मंदिर छिपीया, डी.डी.अग्रवाल पब्लीक स्कूल अदासी-तांडा, सडक-अर्जुनी तालुक्यातील बुध्दीष्ठ इंटरनॅशनल शाळा सौंदड, आमगाव तालुक्यात बुध्दीष्ठ इंटरनॅशनल शाळा आमगाव, देवरी तालुक्यात सनसाईन पब्लीक स्कूल देवरी या आठ शाळांना अनाधिकृत ठरविण्यात आले. त्यामुळे शिक्षण विभाग किती तत्परतेने कारवाही करते याकडे लक्ष आहे.
अनधिकृत शाळेच्या यादीत क्वालिटीचा समावेशच नाही
सन २०१८-१९ या सत्रासाठी अनाधीकृत शाळा म्हणून जिल्ह्यातील आठ शाळांचा समावेश करण्यात आला. परंतु या यादीत आमगाव येथील क्वालीटी पब्लीक स्कूलचा समावेश नाही. एकीकडे या शाळेला परवानगीच नाही असे शिक्षण विभागाची ओरड आहे. तर दुसरीकडे त्या शाळेला अनाधिकृत म्हणूनही घोषित केले नाही. संस्थेचा अंतर्गत कहल असल्यामुळे हे प्रकरण पोलिसात गेले असून चौकशी होईपर्यंत या शाळेला अनाधिकृत शाळांच्या यादीत टाकणे योग्य समजले जाणार नाही असे शिक्षण विभागाच्या एका अधिकाºयाचे म्हणणे आहे.
२४ तासांच्या आत शाळा बंद करण्याचे पत्र
जिल्हा परिषद गोंदियाचा प्राथमिक शिक्षण विभाग क्वालीटी पब्लीक शाळेचा अंतर्गत कलह समजून त्या शाळेला अनाधिकृत शाळेच्या यादीत टाकले नाही. परंतु त्याच प्राथमिक शिक्षण विभागातील आमगाव येथील गटशिक्षणाधिकारी यांनी १५ मे रोजी स्व. पोहूमल राष्ट्रीय शिक्षण संस्था व बहुउद्देशिय शिक्षण संस्था गोंदियाच्या अध्यक्ष, सचिवांच्या नावाने पत्र काढून क्वालीटी पब्लीक स्कूलला तत्काळ बंद करून २४ तासाच्या आत आपल्या कार्यालयाला अहवाल सादर करा अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पत्रातून दिला आहे.