आठ झाले बरे तर चार रुग्णांची पडली भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:19 AM2021-06-27T04:19:53+5:302021-06-27T04:19:53+5:30
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. शनिवारी (दि.२६) जिल्ह्यात आठ बाधितांनी कोरोनावर मात केली ...
गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. शनिवारी (दि.२६) जिल्ह्यात आठ बाधितांनी कोरोनावर मात केली तर चार नवीन रुग्णांची भर पडली. तर मागील सात दिवसापासून जिल्ह्यात एकाही कोरोना बाधिताचा मृत्यू झाला नाही. ही जिल्हावासीयांसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शनिवारी ३,९०४ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यात १,२१४ नमुन्यांची आरटीपीसीआर तर २,६९० नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४ नमुने कोरोना पाॅझिटिव्ह आले. त्याचा पॉझिटिव्हिटी ०.१० टक्के आहे. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आता राज्यात डेल्टा प्लसने डोके वर काढले आहे. त्यामुळे सोमवारपासून पुन्हा जिल्ह्यात निर्बंध लागू होणार आहे. त्यामुळे डेल्टा प्लसच्या अनुषंगाने नागरिकांना अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत १,९२,४७८ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,६६,९४९ निगेटिव्ह आले. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत २,१४,१३५ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी १,९३,१८९ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४१,११० कोरोना बाधित आढळले असून यापैकी ४०,३६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत ४५ ॲक्टिव्ह रुग्ण असून ४७१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
..................
३ लाख ८९ हजार नागरिकांचे लसीकरण
कोरोनाला प्रतिबंध लावण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील १४० लसीकरण केंद्रांवरून ३ लाख ८९ हजार ८४० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यात ३,०३,४६५ नागरिकांना पहिला डोस तर ८६,३७५ नागरिकांना लसीचा दुसरा डाेस देण्यात आला. कोरोना लसीकरणात जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक आघाडीवर असून ६२ टक्के ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
.................
नियमांकडे दुर्लक्ष नकोच
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असला तरी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष न करता त्यांचे काटेकोरपणे पालन करा. मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करा, स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या.