४०४ गावांत ‘एक गाव-एक गणपती’ ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:33 AM2021-09-06T04:33:23+5:302021-09-06T04:33:23+5:30
नरेश रहिले गोंदिया : आबा पाटलांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीने ‘एक गाव-एक गणपती’ची सुरुवात करण्यात आली. ...
नरेश रहिले
गोंदिया : आबा पाटलांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीने ‘एक गाव-एक गणपती’ची सुरुवात करण्यात आली. गणेशोत्सवात गावातील शांतता अबाधित राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ४०४ गावांत ‘एक गाव-एक गणपती’ची संकल्पना राबविली जात आहे. तर ७२६ ठिकाणी सार्वजनिक गणपती मांडले जाणार असून ५२६७ घरांत गणरायाची स्थापना होणार आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू होण्यापूर्वी एका गावात अनेक गणेश मूर्तींची स्थापना केली जात होती. त्यातून आपल्या मंडळाचा देखावा आकर्षक असावा, आपल्याच कार्यक्रमांना लोकांनी प्रतिसाद द्यावा, आपल्या मंडळाची मूर्ती जास्त आकर्षक असावी, अशा भावनेतून गणेश उत्सव मंडळांमध्ये चढाओढ असायची. यातूनच गावातील अनेक गणेश मंडळांचे वाद व्हायचे व गावची शांतता धोक्यात येत होती. या उत्सवादरम्यान गावची शांतता अबाधित राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने ‘एक गाव-एक गणपती’ची संकल्पना जिल्ह्यातील ४०४ गावांत राबविली जात आहे.
....................
असे राहणार ‘एक गाव-एक गणपती’
गोंदिया शहर २, गोंदिया ग्रामीण २२, रावणवाडी ३१, तिरोडा ३९, गंगाझरी १८, दवनीवाडा ९, आमगाव २९, गोरेगाव ३१, सालेकसा १६, देवरी ३४, चिचगड ४६, डुग्गीपार ४४, नवेगावबांध २२, अर्जुनी-मोरगाव ३९, केशोरी २२ अशा ठिकाणी ‘एका गावात-एकच गणपती’ स्थापन केला जाणार आहे.
....................
कोरोनामुळे फिजिकल डिस्टन्स पाळावे लागेल
गणेशोत्सवात दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जातात. त्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी राहायची; परंतु यंदाच्या गणेशोत्वात गर्दी नाही तर फिजिकल डिस्टन्स पाळावे लागणार आहे. तोंडाला मास्क लावणे आवश्यक राहणार आहे. आरतीची जबाबदारी मोजक्याच कार्यकर्त्यांवर देऊन तेही फिजिकल डिस्टन्सचे पालन करतील, असे ठरविण्यात आले आहे.
..............
चोख बंदोबस्तासाठी पथक
गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी जिल्हा पोलिसांकडून पथक तयार करण्यात येणार आहेत. दंगल नियंत्रक तीन पथक, चार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रत्येकी एक ट्रॅकिंग फोर्स, पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे प्रत्येकी एक ट्रॅकिंग फोर्स सी-६० चे पथक राहणार आहे. शिवाय बॉम्बशोध-नाशक पथकही नेमण्यात आले आहे. गावातील सण-उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या पुढाकार घेतील.
..................
मिरवणूक नाहीच
गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी आहे; परंतु मूर्ती दोन फुटांची असावी. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी व मिरवणुकीला बंदी करण्यात आली आहे. कोरोनाचे नियम सर्वांना पाळावे लागणार आहेत.