‘एकलव्य’ देणार निराश्रीतांना आधार
By admin | Published: September 17, 2016 02:06 AM2016-09-17T02:06:55+5:302016-09-17T02:06:55+5:30
अनुसुचीत जातीतील (एससी) निराश्रीतांना ‘रमाई आवास योजने’तून लाभ मिळत असतानाच आता अनुसुचीत जमातीतील
कपिल केकत गोंदिया
अनुसुचीत जातीतील (एससी) निराश्रीतांना ‘रमाई आवास योजने’तून लाभ मिळत असतानाच आता अनुसुचीत जमातीतील (एसटी) निराश्रीतांना आधार देण्यासाठी ‘एकलव्य घरकूल योजना’ येत असल्याचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) कडून राबविण्यात येत असलेल्या एकलव्य घरकूल योजनेंतर्गत नगर परिषदेकडून लाभार्थ्यांची यादी मागविण्यात आल्याची माहिती आहे. यातून ही योजना शहरात येणार असल्याचे म्हणता येईल व असे झाल्यास अनुसुचित जमातीतील निराश्रीतांना यामुळे आधार मिळणार यात शंका नाही.
आजघडीला शहरात ‘रमाई आवास योजना’ राबविली जात असून याचा फक्त अनुसुचित जातीतील (एससी) गरजूंनाच लाभ मिळत आहे. या योजनेंतर्गत नगर परिषदेने यावर्षी ६६ लाभार्थ्यांना लाभ ही दिला आहे. अनुसुचित जातीतील दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील दोन्ही गटातील नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. मात्र फक्त अनुसुचीत जातीतील नागरिकांसाठीच ही योजना असल्याने अनुसुचीत जमातीतील गरजू यापासून दूर राहतात. परिणामी गरज असतानाही त्यांना लाभा पासून वंचीत रहावे लागत असून त्यांचा हिरमोड होतो.
क्वचीत हीच बाब हेरून महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) कडून नगर परिषदेला काही दिवसांपूर्वी अनुसुचीत जमातीतील (एसटी) नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘एकलव्य आदिवासी घरकूल योजने’बाबत पत्र पाठविण्यात आले. या पत्रातून नगर परिषदेला अनु.जमातीतील लाभार्थ्यांची यादी मागविण्यात आली होती. त्यानुसार नगर परिषदेने काही दिवसांपूर्वी म्हाडाचे मुख्य अधिकारी यांच्याकडे शहरातील लाभार्थ्यांची यादी पाठविली आहे.
विशेष म्हणजे, म्हाडाकडून पहिल्यांदाच नगर परिषदेला यादी पाठविण्याबाबत पत्र पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे. यावरून म्हाडा शहरात ‘एकलव्य आदिवासी घरकूल योजना’ राबविण्याच्या तयारीत असल्याचे किंवा भविष्यात या योजनेवर काम करण्यास इच्छूक असल्याचे म्हणता येईल. असे झाल्यास शहराचा चेहरामोहरा तर बदलणार असून अनु.जमातीतील निराश्रीतांना मात्र ही योजना त्यांचे हक्काचे घरकूल मिळवून देणारी ठरणार आहे.
११ लाभार्थ्यांची यादी पाठविली
महाराष्ट्र गृह निर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) कडून आलेल्या पत्राच्या आधारे नगर परिषदेने म्हाडाचे मुख्य अधिकारी यांच्याकडे शहरातील ११ लाभार्थ्याची यादी पाठविली आहे. नगर परिषदेकडे या योजनेंतर्गत १२ अर्ज आले होते व त्यातील ११ अर्ज पाठविण्यात आल्याचे कळले. शहरात भविष्यात या योजनेवर म्हाडा काम करण्यास तयार झाल्यास या लोकांना त्यांचे घरकूल मिळणार असे म्हणता येईल.
२.५० लाखांचे अनुदान
रमाई घरकूल योजनेंतर्गत अनु. जातीतील बीपीएल लाभार्थीला १.५० लाखांचे अनुदान दिले जाते. तर एपीएल लाभार्थीला १.३५ लाखांचे अनुदान दिले जाते. मात्र एकलव्य घरकूल योजनेंतर्गत लाभार्थीला २.५० लाखांचे अनुदान दिले जाते. त्यामुळे म्हाडाची ही योजना अत्यंत लाभाची ठरणार आहे. २.५० लाखांचे अनुदान मिळाल्यास स्वत:चे घरकूल तयार करणे लाभार्थीला सहज शक्य होणार आहे.