जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध दाम्पत्यास मारहाण ; चिरेखनी येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 01:56 PM2024-12-09T13:56:14+5:302024-12-09T13:57:54+5:30

Gondia : फिर्यादीची पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Elderly couple beaten up on suspicion of witchcraft; Incident at Chirekhni | जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध दाम्पत्यास मारहाण ; चिरेखनी येथील घटना

Elderly couple beaten up on suspicion of witchcraft; Incident at Chirekhni

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
ग्रामीण भागात फोफावलेली अंधश्रद्धा काही केल्या कमी होताना दिसत नाही. जादूटोणा प्रकारावरून अनेक ठिकाणी शिवीगाळ, मारहाण, खून अशा घटना घडत आहेत. पोलिससुद्धा अशा प्रकरणांत गुन्हा दाखल करून मोकळे होतात, मात्र जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना दंड देण्यास धजावत नाही. त्यामुळे आरोपी आणखी उदंड होत असून, त्यांच्यात रुजलेली अंधश्रद्धेची कीड आणखी वाढतच जाते. अशीच एक भयावह घटना तालुक्यातील ग्राम चिरेखनी येथे २७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता घडली. 


सविस्तर प्रकरण असे, ग्राम चिरेखनी येथे नामदेव मार्कड पारधी (६५) हे पत्नी सुभद्रा व कारणबाई या दोन पत्नींसोबत राहतात. २७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता आरोपी मुन्ना उर्फ संतोष गुलाब रहांगडाले (४५) व सुन्ना उर्फ प्रमोद रहांगडाले (४२, रा चिरेखनी) हे नामदेव पारधी यांच्या घरासमोर आले व तुझ्यामुळे माझा मुलगा मरण पावला, असे बोलू लागले. यावर नामदेव पारधी यांनी, मी तुमच्या मुलाला काय केले? तुमचा मुलगा माझ्यामुळे कसा मरण पावला, अशी विचारणा केली. यावर मुन्ना रहांगडाले व सुन्ना रहांगडाले या दोघांनी माझ्या मुलावर जादू केली व जादूने मारले असे म्हणत नामदेव पारधी यांना शिवीगाळ करून काठीने पाठीवर व डोक्यावर मारहाण केली. तर पिंटू उर्फ सतीश गुलाब रहांगडाले याने थापडबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानुसार पोलिसांनी बीएनएस ११८ (१), ११५ (२), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला. 


विशेष म्हणजे, पोलिसांकडून काहीच कारवाई केली जात नसल्याने नामदेव मार्कड पारधी यांनी शनिवारी (दि.७) उपविभागीय पोलिस अधिकारी, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना अर्ज पाठविला आहे. त्यात त्यांनी तिरोडा पोलिसांनी माझ्या बयाणानुसार गुन्हा दाखल केला नसून, त्यातून 'तू माझ्या मुलावर जादूटोणा केलास, त्यामुळे माझा मुलगा मरण पावला' हे आरोपींच्या तोंडचे वाक्य पोलिसांनी बयाणातून गहाळ केले. तसेच जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला नाही. आरोपींवर योग्य कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 


फिर्यादीच्या पत्नीचा हात मोडला 
नामदेव पारधी यांच्या तक्रार अर्जानुसार, ते आपल्या दोन पत्नींसह घरी असताना आरोपी मुन्ना, सुन्ना व पिंटू रहांगडाले हे हातात लाठ्याकाठ्या घेऊन आले. त्यांच्या पाठीमागे गावातील ५० ते ६० माणसे होती. तू माझ्या मुलावर जादू केली त्यामुळे माझा मुलगा मरण पावला, असे बोलून तिन्ही आरोपींनी नामदेव पारधी यांना घरातून बाहेर ओढत आणले. त्यानंतर त्यांना व त्यांच्या पत्नींना लाथाबुक्क्या व काठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत पारधी यांच्या पत्नीचा हात मोडला. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत नामदेव पारधी हे घराच्या मागील बाजूने त्यांच्या तावडीतून सुटून तिरोडाच्या दिशेने निघाले. रात्री २ वाजता पोलिस ठाणे गाठून सर्व हकिकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले व उपचारानंतर चिरेखनी येथे सोडून दिले. दुसऱ्या दिवशी पत्नी सुभद्रा यांना तिरोडा पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय व नंतर गोंदियात केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधोपचार केले. त्यात हाड मोडल्याचे निदान झाल्याने पत्नीवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


"या घटनेत तिरोडा पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायद्यान्वये आरोपींवर गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. अन्यथा अशा प्रकरणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जादूटोण्यावरून होणारे खून आता जिल्ह्यात थांबले आहेत. ते सुरू होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसेच लोकांच्या मनातून जादूटोण्याचे भूत काढण्यासाठी व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रशासकीय स्तरावर जनजागृती होणे अनिवार्य आहे." 
- प्रकाश धोटे, जिल्हा संघटक, अंनिस, गोंदिया

Web Title: Elderly couple beaten up on suspicion of witchcraft; Incident at Chirekhni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.