बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:55 AM2021-03-04T04:55:32+5:302021-03-04T04:55:32+5:30
केशोरी : जंगलात गुरे चारण्यासाठी गेलेल्या वृद्धावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना चिचटोला-अंभोरा जंगलात सोमवारी (दि. १) सायंकाळी ...
केशोरी : जंगलात गुरे चारण्यासाठी गेलेल्या वृद्धावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना चिचटोला-अंभोरा जंगलात सोमवारी (दि. १) सायंकाळी घडली. लक्ष्मण गांडव भोगारे (वय ७०, रा. चिचटोला) असे मृत वृद्धाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, येथून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम चिचटोला-आंभोरा येथील रहिवासी लक्ष्मण गांडव भोगारे नेहमीप्रमाणे घरच्या गायी चारण्यासाठी गावाला लागून असलेल्या वनपरिक्षेत्र २६४ आंभोरा येथे सोमवारी (दि. १) गेले होते. जंगलात झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. सायंकाळी फक्त गायीच घरी परत आल्या तेव्हा घरच्या मंडळींना शंका आली व त्यांनी जंगलात शोधाशोध केली, तेव्हा रात्री ११ वाजताच्या दरम्यान जंगलात लक्ष्मण भोगारे मृतावस्थेत पडून असल्याचे दिसले. घरच्या मंडळींनी त्वरित घटनेची माहिती पोलीस आणि वनविभागाला दिली. मंगळवारी (दि. २) वनक्षेत्राधिकारी दर्शना पाटील यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक नान्हे, पठाण, मेश्राम, गुरनुुले, वनरक्षक काळसर्पे, देशमुख, सोलंकी यांनी पंचनामा करून आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविला. त्यानंतर ठाणेदार संदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार निकोडे, रामटेके, होळी यांनी पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन करून कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. पुढील तपास हवालदार निकोडे करीत आहेत.