ज्येष्ठांनी एकटेपणाची भावना बाळगू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 12:32 AM2017-09-06T00:32:53+5:302017-09-06T00:33:08+5:30
आजची पिढी ही घरातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक देत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कायदे तयार करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आजची पिढी ही घरातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाची वागणूक देत नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कायदे तयार करण्यात आले आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना न्याय पाहिजे आहे. त्यांनी कायद्याचा आधार घ्यावा, असे प्रतिपादन न्या. मालोदे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व ज्येष्ठ नागरिक संघाच्या संयुक्तवतीने आयोजीत कायदेविषयक जनजागृती शिबिरात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अॅड.बिणा बाजपेई, नेतराम पारधी, आशा ठाकुर, अॅड. आगाशे उपस्थित होते. पुढे बोलताना न्या. मालोदे यांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आपण एकटे असल्याची भावना मनात आणू नये. तुमच्या पाठीशी इतर ज्येष्ठ नागरिक व संघटना आहेत. प्रत्येक व्यक्तीला म्हातारपण हे येणारच आहे. व्यक्ती विचाराने कमजोर होत नाही तर शरिराने कमजोर होतो. घरातील कुटूंबातील व्यक्तींनी त्यांच्या घरातील ज्येष्ठ नागरिकांचा आदर ठेवावा व जीवनात त्यांचे मार्गदर्शन घ्यावे असे मत व्यक्त केले.
अॅड.बाजपेई यांनी, नागरिकांचे मुलभूत अधिकार व कर्तव्य याबाबत माहिती दिली. ज्येष्ठ नागरिकांची मुले विदेशात किंवा बाहेर ठिकाणी नोकरी करतात व त्यांचे ज्येष्ठ नागरिक असलेले आई-वडील एकटे राहतात. त्यामुळे त्यांना जीवन जगणे कठीण होते, त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. अशावेळी ज्येष्ठ नागरिक वृध्दाश्रमात जावून आपले एकटेपण दूर करतात असे सांगितले. पारधी यांनी, ज्येष्ठ नागरिकांबाबत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. ठाकुर यांनी, ज्येष्ठ नागरिक हे एकटे नसून त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत, त्यांनी एकटेपण बाळगू नये, तसेच त्यांच्या हक्काकरीता त्यांनी जागृत राहावे असे त्यांनी सांगितले. अॅड.आगाशे यांनी, संयुक्त कुटूंबामुळे विकास होतो, परंतू आज संयुक्त कुटूंब पध्दती कमी झालेली दिसून येते. वयोवृध्द व्यक्तींकरीता प्रत्येकाने सहकार्याची भावना ठेवावी तसेच त्यांना मदत करावी असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अधीक्षक एस.जी. कान्हे, जी.सी. ठवकर, श्रीमती डी.ए. थोरात, जी.एन. जैतवार व हेरॉल्ड बॅस्टीन यांनी सहकार्य केले. आभार अॅड.एम.पी. चतुर्वेदी यांनी मानले.