मे महिन्याच्या पहिल्या जि. प. अध्यक्ष निवडणुकीचा साधणार मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2022 01:14 PM2022-04-19T13:14:04+5:302022-04-19T13:17:03+5:30
जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला, मात्र अद्यापही जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली नाही.
गोंदिया : जिल्ह्यातील आठही पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत मंगळवारी (दि. १९) काढण्यात येणार आहे. ही आरक्षण सोडत निघल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर होणार असून, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जि. प. अध्यक्षाची निवड होणार असल्याची माहिती आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला, मात्र अद्यापही जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली नाही. परिणामी, मागील तीन महिन्यापासून निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे. नुकतेच ग्रामविकास मंत्रालयाने अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुका घेण्याबाबत पत्र दिले. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
आधी कोरोनामुळे आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षण रद्द केल्याने मागील दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेत प्रशासकराज सुरू आहे. त्यातच आरक्षणासंदर्भात ग्रामविकास मंत्रालयाने आपले मार्गदर्शन करण्यास तब्बल तीन महिने लावले. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना निवडून आल्यानंतरही अधिकारापासून वंचित राहावे लागत होते. मात्र, आता ही अडचण दूर झाली असून, जिल्हा निवडणूक विभागाने जि. प. अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अध्यक्ष आणि सभापतींची निवड होणे आता निश्चित मानले जात आहे.
आठही पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत
ग्रामविकास विभागाच्या १२ एप्रिलच्या पत्रानुसार जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदांचे आरक्षण संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील अडीच वर्षांच्या कालावधीकरिता जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदांच्या आरक्षित पदांची सोडत सोमवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार आहे.
तीन तालुक्यांत प्राधान्य कुणाला ?
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. जिल्हा परिषदेत भाजप सर्वाधिक २६ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एकूण ५३ सदस्यीय जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी २७ या मॅजिक फिगरची गरज आहे. अपक्षांच्या मदतीने हा आकडा गाठण्याची धडपड भाजपने सुरू केली आहे. जि. प. अध्यक्ष पदासाठी गोंदिया तालुक्यातून संजय टेंभरे, अर्जुनी मोरगाव तालुक्यातून लायकराम भेंडारकर, गोरेगाव तालुक्यातून डॉ. लक्ष्मण भगत यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. पण अध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, हे भाजपचे वरिष्ठ नेते ठरविणार आहेत.
अध्यक्ष निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याला घेऊन वेळेवर काही होऊ शकते. याच जिल्हा परिषदेत भाजप-काँग्रेस अभद्र युतीचा प्रयोग सुद्धा झाला आहे. तर या निवडणुकीत सुद्धा कुरघोडीचे राजकारण होण्याची शक्यता आहे. दोन भिन्न पक्ष एकत्रित येऊन देखील जि. प. मध्ये सत्ता स्थापन करू शकतात. या निवडणुकीला घेऊन सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळेच या निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडी चमत्कार करणार का?
जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी २७ या आकड्याची गरज आहे. काँग्रेस १३, राष्ट्रवादी ८, अपक्ष २, चाबी ४ यांची बेरीज केल्यास २७ हा आकडा गाठता येतो. तशा अंतर्गत हालचाली सुद्धा सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी ऐनवेळी काही चमत्कार करते काय, हे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे.