निवडणुकीमुळे लागणार एसटी महामंडळाला हातभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:14 AM2021-01-13T05:14:43+5:302021-01-13T05:14:43+5:30
गोंदिया : येत्या शुक्रवारी (दि.१५) जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीला घेऊन गोंदिया आगाराच्या ३२ बसेसची बुकिंग ...
गोंदिया : येत्या शुक्रवारी (दि.१५) जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीला घेऊन गोंदिया आगाराच्या ३२ बसेसची बुकिंग करण्यात आली आहे. ३ तालुक्यांसाठी गोंदिया आगाराकडून हे नियोजन करण्यात आले आहे. उर्वरित ५ तालुक्यांसाठी तिरोडा व साकोली आगाराच्या बसेस मागविल्या जाणार आहेत.
जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील १८९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका घेतल्या जात असून शुक्रवारी (दि.१५) मतदान होणार आहे. मतदान म्हटले की, निवडणुकीचे साहित्य व निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रांवर घेऊन जाणे व त्यांना परत घेऊन येणे आदी कामे असतात. अशात जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक साहित्य व कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची व्यवस्था केली जाते. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून या बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या जातात. त्यानुसार, यंदाही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
यामध्ये गोंदिया आगाराने जिल्ह्यातील गोंदिया, आमगाव व गोरेगाव तालुक्यासाठी ३२ बसेसचे नियोजन केले आहे. तिरोडा तालुक्याकडे केवळ तिरोडा तालुका राहणार असून यासाठी तिरोडा आगाराने ४ गाड्यांचे नियोजन केले आहे. तर देवरी, सालेकसा, अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी तालुका साकोली आगाराकडे असून ते या तालुक्यांसाठी बसेसचे नियोजन करणार आहेत. बसेस गुरुवारी (दि.१४) सकाळी ८ वाजता निवडणूक कर्मचाऱ्यांना त्यांच्या केंद्रापर्यंत सोडण्यासाठी निघून जातील व त्यांना सोडून परत येतील. तसेच शुक्रवारी (दि.१५) मतदानाची वेळ संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना मशीन जमा करण्याच्या स्थळी सोडून देतील.
----------------------------
११.७९ लाखांचे भाडे प्रस्तावित
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून बसेस भाडेतत्त्वावर घेतल्या जात आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाला बसस्थानकांना भाडे द्यावे लागते. त्यानुसार, गोंदिया आगाराने ३२ बसेससाठी ११.३६ लाख रुपयांचे भाडे प्रस्तावित केले आहे. तर तिरोडा आगाराने ४ बसेससाठी ४३ हजार रुपयांचे भाडे प्रस्तावित केल्याची माहिती आहे.
-----------------------------