निवडणुकीचा वाढला ज्वर

By admin | Published: October 25, 2015 01:36 AM2015-10-25T01:36:42+5:302015-10-25T01:36:42+5:30

जिल्ह्यात नवरात्रौत्सवाची सांगता होताच गोरेगाव, देवरी, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी या चारही नगर पंचायतींमध्ये निवडणूक प्रचाराने वेग घेतला आहे.

Elections increased fever | निवडणुकीचा वाढला ज्वर

निवडणुकीचा वाढला ज्वर

Next

उरले सहा दिवस : भाजप की राष्ट्रवादी काँग्रेस याचीच चर्चा
गोंदिया : जिल्ह्यात नवरात्रौत्सवाची सांगता होताच गोरेगाव, देवरी, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी या चारही नगर पंचायतींमध्ये निवडणूक प्रचाराने वेग घेतला आहे. ग्रामपंचायत विसर्जित होऊन पहिल्यांदाच नगर पंचायतींची निवडणूक होत असल्याने अनेक जण आपले नशिब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
प्रत्येकी १७ सदस्यांच्या चारही नगर पंचायतीत एकूण ६८ जागांसाठी ३४३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना दि.१९ च्या सायंकाळी चिन्हांचे वाटप झाले. त्यामुळे दोन-तीन दिवस प्रचार साहित्य तयार करण्यात गेले. शिवाय नवरात्रौत्सवात सर्वजण व्यस्त होते. शुक्रवारपासून प्रचाराने वेग घेतला आहे. एका वॉर्डापुरता जनसंपर्क ठेवायचा असला तरी मतदारांची मनधरणी करण्यात सर्व पक्षीय उमेदवारांसोबत काही अपक्ष उमेदवारही असल्यामुळे मतदाररूपी देवाला साकडे घालून प्रसन्न करताना उमेदवारांचा कस लागत आहे.
विशेष म्हणजे ही निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. पाच वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने जिल्हा परिषदेनंतर गोंदिया नगर परिषदेत सर्वाधित पटकावल्या होत्या. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही पक्षाचे वर्चस्व कायम ठेवले होते. मात्र चार महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर भाजपची लोकप्रियता घटून लोक राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजुने उभे ठाकले. काँग्रेस-भाजपच्या एकत्रिकरणामुळे राष्ट्रवादीला सत्ता मिळविता आली नसली तरी जनतेचा कौल लक्षात आला. त्यानंतर देवरी, सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीही राष्ट्रवादीने काबीज केली. आता चार ठिकाणच्या नगर पंचायतीत जनता जनार्दन राष्ट्रवादीला कौल देते की काँग्रेसशी हातमिळवणी करणाऱ्या भाजपला साथ देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आतापर्यंत जिल्हास्तरावरील नेत्यांनीच या निवडणुकीत प्रचारसभा घेतल्या आहेत. मात्र शेवटच्या दोन-तीन दिवसात काही पक्षांची बाहेरील नेतेमंडळी प्रचारसभा घेण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत स्थानिक उमेदवारांचा वैयक्तिक जनसंपर्क, त्यांचा मतदारांवर असलेला प्रभार हे मुद्दे महत्वाचे असले तरी पक्षीय पाठबळामुळे उमेदवारांना निश्चितच ताकद मिळणार आहे. त्यामुळे अपक्षांपेक्षा राजकीय पक्षांच्या उमेदवारांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Elections increased fever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.