नाट्यमय घडामोडीने सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:27 AM2021-02-14T04:27:00+5:302021-02-14T04:27:00+5:30
बोंडगावदेवी : शेवटच्या क्षणापर्यंत चुरस निर्माण झालेल्या बोंडगावदेवी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रतिमा आनंदराव बोरकर यांची बिनविरोध, तर उपसरपंच भाग्यवान फुल्लुके ...
बोंडगावदेवी : शेवटच्या क्षणापर्यंत चुरस निर्माण झालेल्या बोंडगावदेवी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्रतिमा आनंदराव बोरकर यांची बिनविरोध, तर उपसरपंच भाग्यवान फुल्लुके यांची गुप्त मतदान पद्धतीने निवड करण्यात आली. गावकारभाऱ्यांचे स्वप्न पाहणाऱ्यांचा नाट्यमय घडामोडीने अखेरच्या क्षणी भ्रमनिरास झाला.
परिसरासह तालुक्याचे बोंडगावदेवी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. ११ सदस्यांसाठी १५ जानेवारीला निवडणूक घेण्यात आली. त्यात भाजप समर्थित सर्वधर्मसमभाव पॅनलचे आठ उमेदवार विजयी झाले. काँग्रेस, आरपीआय समर्थित ग्रामविकास एकता पॅनलला फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर नामाप्र स्त्री प्रवर्गासाठी आरक्षण होताच निवडून आलेल्या सहा महिला सदस्यांमधून अनेकांनी सरपंच पदासाठी दावेदारी पुढे केली. भाजप समर्थित पॅनलकडे बहुमत असल्याने ग्रामविकास पॅनलनी विरोधात बसण्याची भूमिका अगोदर जाहीर केली होती. स्थानिक सत्ताधारी पॅनलच्या नेत्यांनी सरपंच व उपसरपंच पदांचे उमेदवार निश्चित केल्याने निवडूृन आलेल्या सदस्यांमध्ये रुसवे-फुगवे सुरू झाले. काहींनी आपली दावेदारी पुढे केल्याने पेच निर्माण झाला. सत्ताधारी पॅनलचे प्रतिमा आनंदराव बोरकर, माया धर्मेद्र मेश्राम, निराशा शिवकुमार मेश्राम यांनी सरपंच, उपसरपंच पदांसाठी आग्रही दावेदारी केली. आपला तिघांचा गट करून ते भूमिगत झाले. ग्रामविकास पॅनलच्या सदस्यांनी त्या तिघांना पाठिंबा दर्शविला. नाट्यमय घडामोडी सुरू झाल्या. निवडणुकीदिवशी गावात तणावाची स्थिती निर्माण झाली. घरावर शेकडो महिला, पुरुषांचा जमाव आला. सदस्य पळवापळवीचा प्रकार सुरू झाला. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात झालेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान भाजप समर्थित पॅनलनी ऐनवेळी सरपंच पदासाठी प्रतिमा बोरकर यांचा, तर उपसरपंच पदासाठी भाग्यवान फुल्लुके यांचा उमदेवारी अर्ज सादर केला. काँग्रेससमर्थित पॅनलनी सरपंच पदासाठी प्रतिमा बोरकर यांचे २, तर उपसरपंच पदासाठी माया मेश्राम यांचा उमेदवारी अर्ज सादर केला. अखेर प्रतिमा बोरकर यांनी २ उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या. उपसरपंच पदासाठी दोन उमेदवार असल्याने गुप्त मतदान घेण्यात आले. भाग्यवान फुल्लुके यांना सात मते तर माया मेश्राम यांना ४ मते पडली. उपसरपंचपदी भाग्यवान फुल्लुके निवडून आले. गावकारभारी बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नियोजित सदस्यांचा मात्र हिरमोड झाल्याचे चित्र दिसत होते. अध्याशी अधिकारी म्हणून वरिष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी अशोक बरईकर यांनी काम पाहिले. तलाठी अरविंद झलके यांनी निवडणूक प्रक्रियेत योगदान दिले. ग्रामविकास अधिकारी पी. एम. समरीत यांनी सभेच्या इतिवृत्ताची जबाबदारी सांभाळली.