१० केंद्रांवर आज शिक्षक मतदार संघाची निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2017 01:28 AM2017-02-03T01:28:29+5:302017-02-03T01:28:29+5:30
नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शुक्रवार दि.३ रोजी मतदान होत आहे.
गोंदिया : नागपूर विभागीय शिक्षक मतदार संघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शुक्रवार दि.३ रोजी मतदान होत आहे. सर्व तालुकास्थळांसह नवेगावबांध आणि दवनीवाडा अशा एकूण १० ठिकाणी यासाठी मतदान केंद्र राहणार आहेत. जिल्ह्यातील ३३२१ शिक्षक मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजतादरम्यान मतदान होणार आहे.
एकूण शिक्षक मतदारांमध्ये २६९७ पुरूष तर ६२४ स्त्री मतदार आहेत. सर्वाधिक ८४३ मतदार गोंदिया तालुक्यातील आहेत. गोंदियासह तिरोडा, आमगाव, सालेकसा, गोरेगाव, सडक-अर्जुनी, देवरी आणि अर्जुनी मोरगाव येथील तहसील कार्यालयात मतदान केंद्र राहणार आहे. तसेच दवनीवाडा येथे जि.प. प्राथमिक शाळेत तर नवेगावबांध येथे जि.प. हायस्कूलमध्ये मतदान होणार आहे. गुरूवारी (दि.२) मतदान केंद्रांवर संबंधित कर्मचारी मतदानाच्या साहित्यासह रवाना झाले.
सर्वाधिक ८४३ मतदार गोंदिया केंद्रावर, ४२१ मतदार तिरोडा, १२९ दवनीवाडा, ४०१ आमगाव, १४१ सालेकसा, ३०१ गोरेगाव, २०५ सडक अर्जुनी, ३४६ देवरी, २२४ नवेगावबांध, तर ३१० मतदार अर्जुनी मोरगाव केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
या मतदानासाठी १३ प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. यामध्ये निवडणूक आयोगाच्या मतदार ओळखपत्राशिवाय पासपोर्ट, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड, पदवी/पदविका प्रमाणपत्र छायाचित्रासह, राज्य/केंद्र/सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिलेले संबंधित विभागाचे ओळखपत्र, पोस्ट/बँकांचे छायाचित्रासह असलेले ३१ डिसेंबर २०१६ पुर्वीचे पासबुक, संपत्तीविषयक नोंदणी, विक्रीपत्र ज्यामध्ये पासपोर्ट आकाराचे छायाचित्र असलेले दस्ताऐवज, छायाचित्रासह असलेले रेशन कार्ड, मागासवर्ग असल्याचे छायाचित्रासह प्रदान केलेले प्रमाणपत्र, छायाचित्रासह असलेला शस्त्र परवाना, दिव्यांग व्यक्तीचे छायाचित्रासह प्रमाणपत्र, आधारकार्ड व स्मार्ट कार्ड आदी प्रकारच्या कागदपत्रांचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)