विजेच्या लंपडावाने ग्रामीण नागरिक त्रस्त
By admin | Published: May 9, 2017 12:57 AM2017-05-09T00:57:53+5:302017-05-09T00:57:53+5:30
मागील एक महिन्यापासून ग्रामीण व शहरी भागात विजेचा लंपडाव सुरु आहे. विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहे.
अधिकाऱ्यांना निवेदन : दोन महिन्यांपासून वाढला प्रकार
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदोरा-बुजरुक : मागील एक महिन्यापासून ग्रामीण व शहरी भागात विजेचा लंपडाव सुरु आहे. विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झाले आहे. आठ दिवसांपासून ग्रामीण भागात ऐन दुपारच्या वेळेत भारनियमन केले जात आहे.भारनियमनाची वेळ सकाळी ६ वाजतापासून १० वाजतापर्यंत ठेवावी, यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा तिरोडाच्यावतीने तहसीलदार तिरोडा यांना निवेदन देण्यात आले आहे.
मागील दोन महिन्यांपासून विज पुरवठा कधीही खंडीत होत असते. रात्र असो किंवा दिवस, वेळेचा कुठलाच बंधन न ठेवता मनमर्जीने विद्युत पुरवठा बंद केला जातो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असताना सकाळी १० वाजतापासून तापमानाचा पारा चढत आहे, घरात राहणे कठीण होत आहे. परिसरातील लघु, कुटीर उद्योगांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.
लहान मुले, म्हातारे व्यक्ती सुध्दा उन्हामुळे घाबरले असतात. याच वेळेत विद्युत विभाग सकाळी १० वाजतापासून सायंकाळी ४ वाजतापर्यंत विद्युत पुरवठा बंद ठेवतात. रात्री ७ वाजतापासून अजून विजेचा लंपडाव सुरु असतो. यात ग्रामीण भागातील जनता त्रस्त झाले आहेत.
या संदर्भात विज वितरण कार्यालयाकडे नागरिकांनी तक्रार केली मात्र या गंभीर समस्येकडे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष केले आहे. तिरोडा तालुक्यात मागील अनेक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. एप्रिल, मे महिना तापत आहे. पारा ४५ अंशापर्यंत पोहचला आहे. दुपारच्यावेळीही भारनियमन होत आहे. उन्हामुळे अंगाची लाई-लाई होत असताना महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीतर्फे ग्रामीण भागात ६ तास विज पूरवठा खंडीत केला जातो. भर उन्हात दुपारच्या वेळी भारनियमन केले जात आहे. सतत होणारे भारनियमन बंद करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष रफीक शेख यांच्या नेतृत्वात तहसीलदार कुंभरे व नायब तहसीलदार पटले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सदर निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता तिरोडा यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी अनेक शेतकरी व नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)