वीज चोरांना ‘जोर का झटका’
By admin | Published: January 11, 2016 01:42 AM2016-01-11T01:42:22+5:302016-01-11T01:42:22+5:30
वीज चोरीच्या प्रकारावर आळा बसावा यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने यावर तोडगा म्हणून आयआर मीटर (इन्फ्रारेड) लावण्याची मोहीम हाती घेतली आहे.
कपिल केकत गोंदिया
वीज चोरीच्या प्रकारावर आळा बसावा यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने यावर तोडगा म्हणून आयआर मीटर (इन्फ्रारेड) लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. वीज वापराची अत्यंत तंतोतंत रिडींग घेणारा ( एक्युरेट कन्झम्पशन रिडींग) हा मीटर असून यामध्ये छेडछाड केल्यास त्याचा भुर्दंड ग्राहकालाच पाच पटीने बसणार असल्याने वीज चोरांना आता ‘जोर का झटका’ अधिकच जोरदार बसणार आहे.
वीज चोरीच्या बाबतीत वीज मंडळाच्या यादीत गोंदिया जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातही येथील विशेषता अशी की, वीजचोरी करणाऱ्यांवर किंवा थकबाकीदारांकडे वीज मंडळाचे अधिकारी- कर्मचारी गेल्यास संबंधीतांकडून त्यांना मारहाण, शिवीगाळ व धमकावणीच्या घटना घडतात. या सर्व प्रकारांमुळे वीज वितरण कंपनीच्या नाकी नऊ आले असून वीज चोरीचे प्रकार काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. त्या दृष्टीने महावितरणचे काही ना काही प्रयत्न सुरू असून त्यातूनच इन्फ्रारेड मीटर हे शस्त्र महावितरणच्या हाती लागले असून त्याचा वापर करण्याबाबत महावितरण गंभीर आहे.
केंद्र शासनाच्या गतीमान उर्जा विकास योजनेंंतर्गत (आरएपीडीआरपी-बी) शहरांत इन्फ्रारेड मीटर लावण्यासाठी विशेष कार्यक्रम आखण्यात आला होता. विशेष म्हणजे विदर्भात गोंदिया जिल्ह्यात वीज हानीचे सर्वाधीक प्रमाण असल्याने गोंदिया जिल्ह्याचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला होता.
यांतर्गत गोंदिया शहराला प्राथमिकता देऊन इन्फ्रारेड मीटर बसवायचे होते. मात्र शहरात थोडेफार मीटर बदलविण्यात आले.
दरम्यान विद्ममान अधिक्षक अभियंता कबीरदास चव्हाण यांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी वीजचोरीच्या प्रकारांवर आळा बसावा यासाठी इन्फ्रारेड मीटर लावण्याची मोहीम पुन्हा हाती घेतली आहे. शहरातील वीज मीटर लवकरात लवकर बदलण्यात यावे यासाठी त्यांनी दोन कार्यादेश दिले आहेत.
लवकरात लवकर इन्फ्रारेड मीटर लावण्यात आल्यावर नक्कीच वीज चोरीच्या प्रकारांवर आळा बसेल असे महावितरणकडून कळले.