गोंदिया-गडचिरोली जिल्ह्यात हत्ती अभयारण्य; पाठविला प्राथमिक प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 03:23 PM2023-08-24T15:23:23+5:302023-08-24T15:24:54+5:30
राज्यातील पहिलाच प्रकल्प
गोंदिया : मागील वर्षभरापासून गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात पश्चिम बंगालमधून आलेल्या हत्तींच्या कळपाचा वावर आहे. हा कळप या दोन्ही जिल्ह्यांतील जंगलांमध्ये स्थिरावला आहे. याच अनुषंगाने गोंदिया-गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील पहिले हत्ती अभयारण्य स्थापन करण्याचा प्राथमिक प्रस्ताव मुख्य वन्यजीवरक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याचे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व वनसंरक्षक जयराम गौडा यांनी सांगितले.
गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत महाराष्ट्रातील पहिले हत्ती अभयारण्य स्थापन करण्यासाठी अनुकूल स्थिती आहे काय, त्यासाठी कुठल्या उपाययोजना आणि सोयीसुविधा निर्माण करण्याची गरज आहे, या प्रकल्पाचे नेमके फायदे-तोटे काय आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी नेमका किती निधी लागेल, अभयारण्य स्थापन करण्यासाठी कुठल्या गोष्टी करण्याची गरज आहे, यासंदर्भातील प्राथमिक प्रस्ताव तयार करून तो राज्याच्या मुख्य वन्यजीवरक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मुख्य वन्यजीवरक्षक कार्यालयाने मंजुरी दिल्यानंतर तो प्रस्ताव राज्य वन्यजीव मंडळ व नंतर केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास जिल्ह्यातील वैभवात पुन्हा भर पडणार असून, व्याघ्र प्रकल्पासह हत्ती अभयारण्याची जोड मिळणार आहे.
मागील वर्षी दाखल झाला होता कळप
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ओडिशाहून छत्तीसगडमार्गे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात २३ हत्तींचा कळप महाराष्ट्रात दाखल झाला होता. त्यानंतर या कळपाने गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यांतील काही भागांत धुमाकूळ घातला. गोंदिया जिल्ह्यात या हत्तींच्या कळपाने येरंडी दर्रे येथील एका शेतकऱ्याचा बळीसुद्धा घेतला होता. तर शेकडो हेक्टरमधील धानपिकाचे नुकसान केले होते.
दोन जिल्ह्यांत स्थिरावले
मागील वर्षी ओडिशाहून आलेले हत्तींचा कळप गोंदिया आणि गडचिरोलीच्या सीमेवरून अनेकदा ये-जा करीत होता. हा कळप परत ओडिशा राज्यात जाईल, असा अंदाज लावला जात होता. पण, मागील वर्षभरापासून तो याच भागात स्थिरावला आहे.
हत्तींची येथे वारंवार होणारी हालचाल लक्षात घेता, हत्ती राखीव विभागाला अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यास मदत होईल. त्याच दृष्टिकोनातून हत्ती अभयारण्य स्थापन करण्याचा विचार केला जात आहे.
पर्यटनास चालना व रोजगार निर्मितीस मदत
हत्ती अभयारण्य स्थापन करण्यास मंजुरी मिळाल्यानंतर पर्यटनास चालना मिळणार असून, त्यातून राेजगार निर्मिती व आर्थिक उत्पन्न वाढविण्यास मदत होणार आहे. राज्यात हत्तींची संख्या जास्त नाही. त्यामुळे हा प्रकल्प त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुख्य वन्यजीवरक्षक कार्यालयाची मंजुरीची सध्या प्रतीक्षा आहे. या प्रकल्पासाठी गोंदिया, गडचिरोली आणि छत्तीसगड राज्याचे सीमांकन केले जाणार आहे. हत्ती अभयारण्यासाठी प्रस्तावित क्षेत्र ४ हजार किमीपेक्षा थोडे अधिक प्रस्तावित केले असल्याचे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व वनसंरक्षक जयराम गौडा यांनी सांगितले.