सीईओच्या उन्माद वागणुकीविरुद्ध ग्रामसेवक युनियनचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:33 AM2021-08-21T04:33:26+5:302021-08-21T04:33:26+5:30
गोंदिया: जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच त्यांच्या दडपशाही धोरणाच्या विरोधात ग्रामसेवकांनी एल्गार पुकारून कामबंद ...
गोंदिया: जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच त्यांच्या दडपशाही धोरणाच्या विरोधात ग्रामसेवकांनी एल्गार पुकारून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
जिल्हा परिषदेत पदाधिकारी नसल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आपला मनमर्जी कारभार चालवित आहेत. ग्रामसेवक युनियन वगळता त्यांच्या दडपशाहीला कुणीच विरोध दर्शविला नाही. अनेक दिवसांपासून कोणत्याही प्रवर्गाची पदोन्नती असेल, अनुकंपा भरती असेल, कालबद्ध पदोन्नती असेल व इतरही आस्थापनाविषयी बाबी असतील त्या त्यांनी केल्या नाही. केवळ सर्व प्रवर्ग संघटनांना चॉकलेट देऊन संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना टार्गेट करून दडपशाही केली जात आहे. अनेक लोकांवर आपला धाक बसविण्यासाठी चूक नसताना ही निलंबनाची कारवाई केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दडपशाहीच्या धोरणात काही विभाग प्रमुखही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. ग्रामसेवक युनियन कर्मचारी यांच्या आत्मसन्मानाच्या लढाईत प्रातिनिधिक स्वरूपात उतरली आहे. एक महिन्यापासून असहकार आंदोलन सुरू आहे. १६ ऑगस्टपासून ग्रामसेवकांचे पूर्ण जिल्ह्याचे काम बंद आंदोलन सुरू आहे. सर्व पंचायत समिती समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन दाबून टाकण्यासाठी सीईओंनी पोलिसांचा वापर केला असून गेल्या आठवड्यापासून सर्व तालुकाध्यक्ष, सचिव यांना पोलीस विभागाकडून कलम १४४ व साथ रोग प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे नोंद करण्याची नोटीस दिली आहे. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दबावात पोलीस कारवाईच्या भूमिकेत होती. मात्र गोंदिया जिल्हा युनियन या धमक्यांना भीक न घालता आपल्या आंदोलनावर कायम आहेत. पोलीस मेळावे, राजकीय सभा यांच्यावर गुन्हे नोंद न करता आम्ही लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनावर गुन्हे नोंद करीत असतील तर आमची तुरुंगात जाण्याची तयारी आहे, असा पवित्रा ग्रामसेवक युनियनने घेतला असल्याचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी म्हटले आहे.