टोयागोंदीच्या महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार
By Admin | Published: October 20, 2016 12:16 AM2016-10-20T00:16:34+5:302016-10-20T00:16:34+5:30
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर असलेल्या व सालेकसा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील टोयागोंदी या गावातील महिलांनी
ठाण्यावर धडक : दखल घेण्यासाठी पोलिसांवर दबाव
सालेकसा : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर असलेल्या व सालेकसा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील टोयागोंदी या गावातील महिलांनी गावात दारूबंदी करून अवैध दारू विक्री तत्काळ बंद करावी यासाठी सरळ सालेकसा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला.
टोयागोंदी या गावात अनेक वर्षापासून अवैध दारूचा व्यवसाय काही लोक करीत आहेत. त्यामुळे गावातील वातावरण बिघडले आहे. दारूमुळे तरूण वर्गासह बालकांचाही कल मद्यपानाकडे वाढत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. याचा दुष्प्रभाव गावातील सामाजिक स्वास्थ्यावर पडत असून गावातील महिलांना व मुलींना असुरक्षित वाटू लागले आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. गावात पूर्णपणे दारूबंदी करावी यासाठी आधीसुध्दा निवेदन देण्यात आले. परंतु दारूबंदीसाठी पाऊल उचलण्यात आले नाही, असे महिलांनी सांगितले. त्यामुळे शेवटी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. टोयागोंदी येथील सर्व महिला २० किमी अंतरावरून सालेकसा येथे पोहोचल्या. गावात मोर्चा काढून नगर भ्रमण करीत सरळ पोलीस स्टेशनवर धडक दिली. तेथे काही काळ धरणे देत दारूबंदीचा आवाज बुलंद केला व पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांना निवेदन देऊन दारूबंदीसाठी आग्रह धरला.
मोर्चाचे नेतृत्व टोयागोंदी येथील सरपंच गीता लिल्हारे, उपसरपंच रत्नकला पटले यांनी केले असून यात ज्योती साखरे, गितेश्वरी साखरे, गीता वट्टी, पुष्पा पंधरे, मीना मरकाम, डुलेश्वरी मच्छिरके, ज्योती अशोक साखरे, चंपा सहारे, सविता साखरे, चंद्रकला भलावी, कला सवासेठी, माया भोंडेकर, जानकी अलकरा, सरीता भोंडेकर, विमला मरकाम, मीना टेंभुकर, मन वट्टी, अग्रता लिल्हारे, सोनकी रतोने, कविता वट्टी, निर्मला लिल्हारे, जामवंती ढेकवार सहभागी झाल्या. (ता.प्रतिनिधी)
- तत्काळ कार्यवाही करणार
टोयागोंदीसह तालुक्यातील विविध ठिकाणी असलेली अवैध दारूविक्रीची तक्रार पुढे येत आहे. त्यावर तत्काळ पायबंद घालण्याची कारवाई सुरू आहे. पोलीस मित्र सरपंच, पोलीस पाटील यांच्या माहितीने संपूर्ण अवैध दारूबंदीवर संपूर्ण पायबंद घालण्यासाठी पोलीस विभाग तयार असल्याचे ठाणेदार मोहन खंदारे यांनी सांगितले.
दारूबंदीसाठी योग्य कारवाई करून अवैध दारु विक्री थांबविली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे धरणे आंदोलन करण्याचा इशारा टोयागोंदीच्या महिलांनी दिला.