दारुबंदीसाठी महिलांचा एल्गार
By admin | Published: June 22, 2016 01:42 AM2016-06-22T01:42:51+5:302016-06-22T01:42:51+5:30
शहरात शंभरापेक्षा अधिक ठिकाणी अवैध दारु विक्री केली जाते. त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे.
पोलीस ठाण्यात धडक : शहरात १०० पेक्षा अधिक अवैध दारु विक्रीची केंद्रे
तिरोडा : शहरात शंभरापेक्षा अधिक ठिकाणी अवैध दारु विक्री केली जाते. त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. अवैध दारु विक्रीमुळे महिला व मुलींना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अवैध दारु विक्री तत्काळ व कायमची बंद करा, अशी मागणी करीत महिलांनी थेट पोलीस ठाणे गाठून दारुबंदीसाठी एल्गार पुकारला आहे.
सामाजिक कार्यकर्ते अतुल गजभिये यांच्या नेतृत्वात जयश्री बनकर, कुदा भोपे, अनिता ठवकर, माय सोनवाने, जयकला रंगारी, सुनता भोयर, संध्या सिंगनजुडे, वच्छला कापसे, भागरता चौधरी, लता तुमसरे, रेखा बघेले, कुंदा उकेबोंदरे, निर्मला खोब्रागडे, रेखा बारबैले, रजनी तुमसरे, दीपक कापसे, महेश तुमसरे, शामराव माहुले, लोमेश आंबेडारे, गणेश सिंगनजुडे, कमला तुमसरे, पोर्णिमा बरियेकर, मनिषा बरियेकर, चंद्रकला ठवकर, मुक्ता ढबाले, दुर्गा झेलकर, नंदा सेलोकर, अनिशा शेख, शिला माहुले, रामू बारबैले, निर्मला मेश्राम या महिलांचा समावेश होता.
शहरातील महिलांनी सोमवारी पोलीस ठाणे गाठून शहरातील विशेषत: नेहरु वार्डातील अवैध दारु बंदी करण्याची मागणी केली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणात पोलीस स्टेशन आहे.
पोलीस स्टेशनपासून शहरातील चारही बाजूला जाण्यासाठी केवळ दहा मिनिटांचा कालावधी लागतो. तरीही शहरात सर्रास मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री केली जाते. त्यातच शहरातील नेहरु वार्डात अवैध दारु विक्रीला ऊत आला आहे. विशेष म्हणजे, दारु विक्रेत्यांचे घर भर रस्त्यावर आहेत. त्यातच याच मार्गाने पोलिसांनी सतत ये-जा असते. तरीही अवैध दारु विक्री जोमात व सर्रास सुरुच राहते. त्यामुळे यासर्व प्रकारात पोलिसांची मूकसंमती आहे. तरीही अवैध दारु विक्री जोमात सुरुच राहते.
दिसवभर आणि रात्री सुद्धा अवैध दारु विक्री सुरु असते. त्यामुळे नागरिकांना विशेषत: महिलांना व मुलींना त्याचा प्रचंड त्रास होतो. दारु पिणारे हे रस्त्यावरच वाहन उभे ठेवतात. शहरातील चौका-चौकात दारु पिणाऱ्यांचे गुत्थे उभे राहतात. परिणामी सायंकाळच्या वेळेस शहरातील वातावरण प्रचंड बदलते. त्यामुळे रहदारीचा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. शहरात दारु विक्रेत्यांची संख्या मोठी असल्याने त्यांची गुंडागर्दी सुद्धा वाढलेली आहे. दारुविक्रीस विरोध केल्यास अश्लील शिवीगाळ करणे, लोकांना धमकावणे, त्यांच्या घरावर चालून जाणे, दारुड्या लोकांची रहदारीने जाणाऱ्या महिला व मुलींना शेरेबाजी करणे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे दारु विक्री असलेल्या रस्त्याने महिला व मुलींनी जाणेच बंद केले आहे.
अवैध दारु विक्रेत्यामुळे परिसरात भांडणाचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. त्याचा मुलावर देखील विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे शहरातील शांती भंग झाली आहे.
दारु पिणारे लोक कुठेही उलटी व लघुशंका करीत असल्याने त्याचा सुद्धा त्रास सहन करावा लागत असल्याची विदारक स्थिती महिलांनी मांडली. अवैध दारु विक्रीमुळे अल्पवयीन व तरुण मुले व्यसनाधिन झाली आहेत. त्यामुळे गुन्हेगारीचे व भांडणाचे प्रमाण सुद्धा वाढले असल्याचे दिसते.
अश्लील शिवीगाळीमुळे बालकांवर देखील विपरित परिणाम होत असल्याची माहिती निवेदनातून देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील अवैध दारु विक्री बंद करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन राज्याचे समाजकल्याण व विशेष सहाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भूजबळ, जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी आणि पोलिस निरीक्षकांना पाठविण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
शहरात मोहफुलांच्या दारुची अवैध विक्री केली जाते. विशेषत: ग्रामीण भागात मोहफुलांची खरेदी करुन अवैधरित्या दारु काढली जाते. अशाप्रकारे अवैध दारु काढून ती शहरात किरकोळ विक्रीसाठी आणली जाते. या दारुला अधिक तीव्र करण्यासाठी त्यात केमिकल्ससुद्धा टाकले जात असल्याची चर्चा आहे. अशा केमिकल्समुळे आरोग्यास अपाय होण्याची शक्यता आहे. दारु गाळणाऱ्यावरच कारवाई केल्यास शहरातील अवैध दारु विक्रीवर आळा घातला येईल.