कारुटोला येथे महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:34 AM2021-08-17T04:34:30+5:302021-08-17T04:34:30+5:30
साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील ग्राम कारुटोला येथे अवैध दारूविक्रेता विरुध्द ग्रामपंचायत तसेच बचत गटाच्या महिलांनी एल्गार पुकारून गावात दारूबंदी ...
साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील ग्राम कारुटोला येथे अवैध दारूविक्रेता विरुध्द ग्रामपंचायत तसेच बचत गटाच्या महिलांनी एल्गार पुकारून गावात दारूबंदी केली. त्यामुळे अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.
लॉकडाऊन काळात परवाना प्राप्त देशी दारू दुकाने तसेच बार बंद होते. त्याचा फायदा घेत कारुटोला येथे तीन ठिकाणी अवैध देशी दारूची विक्री जोमात सुरू होती. त्यामुळे मुख्य मार्गावर सकाळपासूनच गर्दी होत होती. गावातील अनेक पुरुषांना दारूचे व्यसन जडले होते. याचे विपरीत परिणाम महिलांना भोगावे लागत होते. यामुळे बऱ्याच दिवसांपासून गावातील महिला संतप्त होत्या. पोलिसांना सांगूनही काही कारवाई होत नव्हती, त्यामुळे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहणानंतर गावातील बचत गटाच्या महिला ग्रामपंचायतच्या पटांगणावर एकत्र आल्या व सरपंच उमराव बोहरे यांना दारूबंदीसाठी सभा घेऊन ठराव घेण्यास भाग पाडले.
त्यानुसार ग्रामपंचायतने एकमताने अवैध दारूविक्रीविरुध्द ठराव पारित केला. ठरावात ग्रामपंचायतच्या समोर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या २०० मीटरच्या आत जी अवैध दारूविक्री सुरू आहे ती बंद करावी, असे नमूद करून पोलीस विभागाने तत्काळ कारवाई न केल्यास गावातील सर्व महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी सरपंच बोहरे, ग्रा.पं. सदस्य तसेच संजीवनी ग्रामोत्थान संस्था व गटाच्या लता पटले, गीता गोंडाणे, कुंदा टेंभरे, छाया कटरे, गीता ब्राह्मणकर, सिंधू गजभिये, सुनीता पटले, निरुता नंदेश्वर, उज्ज्वला नंदेश्वर, मीनाक्षी कटरे, पूर्णा ब्राणकर, शामकला पटले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मेघराज हेमने, वामन पटले, भीमराज बोहरे, संतोष बोहरे, ब्राह्मणकर तसेच गावातील नागरिक व जिजामाता बचत गट, दैनिक बचत गट, सावित्रीबाई फुले बचत गट, आराधना बचत तसेच इतर बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.