पात्र उमेदवारांना डावलले, अपात्र उमेदवारांची निवड; वीज वितरण विभागाचा अजब कारभार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 11:57 AM2023-09-09T11:57:10+5:302023-09-09T12:00:50+5:30
पात्र उमेदवारांचा आंदोलनाचा इशारा
देवरी (गोंदिया) : सन २०२३-२४ या एक वर्षासाठी शिकाऊ उमेदवार म्हणून निवड झालेल्या १६ पात्र उमेदवारांना वीज वितरण उपविभाग देवरीच्या कार्यकारी अभियंत्यांनी अपात्र ठरविले. तर अपात्र असलेल्या उमेदवारांची निवड केल्याने पात्र उमेदवारांवर झालेल्या अन्यायाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा पात्र उमेदवारांनी दिला आहे.
सविस्तर वृत्त असे की, आयटीआय पास झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना वीज वितरण विभागामध्ये शिकाऊ उमेदवारी भरतीसाठी (अप्रेंटिसशिप) इलेक्ट्रिशियन, वायरमन व काॅम्प्युटर ऑपरेटर या पदाच्या ३६ जागा भरण्याकरिता दिनांक १ ऑगस्ट रोजी वर्तमानपत्रात जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. त्या जाहिरातीनुसार विद्यार्थ्यांनी वीज वितरण विभागाकडे ऑनलाइन अर्ज सादर केला. त्या अर्जांची छाननी करून वीज वितरण विभागाने पात्र उमेदवारांना कागदपत्रांच्या छाननीसाठी दिनांक २३ व २४ ऑगस्ट रोजी येथील कार्यालयात बोलावले होते. त्यावेळी उमेदवारांनी मुख्य गुणपत्रिका बोर्डाकडून मिळाली नसल्याने प्रोव्हिजनल गुणपत्रिका आयटीआयच्या प्राचार्यांच्या सही, शिक्क्यानुसार सादर केली होती. या गुणपत्रिकेला ग्राह्य धरून वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी उमेदवारांना पात्र करत पहिली निवड यादी दिनांक २८ ऑगस्ट रोजी प्रकाशित केली होती.
परंतु, ज्या उमेदवारांची गुणवत्ता यादीनुसार निवड झाली नाही. त्यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना पात्र उमेदवारांकडे मूळ (ओरिजिनल) गुणपत्रिका नाही, असे सांगितले. यावरून कार्यकारी अभियंता डी. एम. फुलझेले यांनी पहिल्या यादीत निवड झालेल्या गुणानुक्रमे गुणवत्ता यादीत असलेल्या १६ उमेदवारांची निवड रद्द करत दुसरी निवड यादी प्रकाशित करून अपात्र उमेदवारांना प्रवेश देऊन पात्र उमेदवारांवर अन्याय केला. या भरती प्रक्रियेत काहीतरी गौडबंगाल झाल्याचा आरोप करत पात्र उमेदवारांनी कार्यकारी अभियंत्यांवर आरोप केले. तसेच जर ८ दिवसांच्या आत न्याय मिळाला नाही व निवड करण्यात आली नाही तर कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा या १६ पात्र उमेदवारांनी दिला आहे. या पात्र उमेदवारांना न्याय देण्याची मागणी त्यांच्या आयटीआयच्या प्राचार्य व पालकांनी केली आहे.
वीज वितरण विभागाने वर्तमानपत्रात प्रकाशित केलेल्या जाहिरातीत गुणपत्रिकेबद्दल कोणतीही अट व शर्त टाकलेली नव्हती. आम्ही रितसर ऑनलाइन अर्ज सादर केला. त्या अनुषंगाने कागदपत्रांच्या पडताळणीच्या वेळेससुद्धा वीज वितरण विभागाने आमच्या गुणपत्रिकेवर आक्षेप घेतला नाही व दुसऱ्या दिवशी निवड यादी प्रकाशित केली. त्या अनुषंगाने आम्ही पात्र झालो. परंतु, यादी लावल्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी आयटीआयच्या प्राचार्यांचा सही, शिक्का खोटा असल्याचे आम्हाला सांगून आमची निवड रद्द केली. असे म्हटले तर आम्ही त्यांना प्राचार्यांचे कार्यकारी अभियंत्यांच्या नावाचे पत्रसुद्धा सादर केले. ज्याठिकाणी आम्ही प्रशिक्षण घेऊन परीक्षा पास केली अशा प्राचार्यांचे पत्र देऊनसुद्धा कार्यकारी अभियंता आमच्यासोबत न्याय करायला तयार नाहीत. न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व १६ उमेदवार कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत. याची सर्वस्वी जबाबदारी वीज विभागाची राहील.
- वैभव बोहरे, पात्र उमेदवार
शिकाऊ उमेदवारांच्या ३६ जागांकरिता २५० अर्ज आमच्याकडे आले होते. या अर्जांची छाननी करून आम्ही ३६ लोकांची प्रथम निवड यादी लावली होती. परंतु, प्रथम यादीत निवड झालेल्या उमेदवारांनी प्रोव्हिजनल मार्कशीट सादर केली, त्यावर आमचा आक्षेप आहे. आमच्या कर्मचाऱ्यांनी छाननीच्या वेळेस याकडे लक्ष द्यायला हवे होते. परंतु, ते दिले नाही. याबद्दल त्या कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करू व गुणपत्रिकेवर प्राचार्यांच्या सही, शिक्क्याची शहानिशा करून पुढील कारवाई करू.
- डी. एम. फुलझेले, कार्यकारी अभियंता, वीज वितरण उपविभाग, देवरी.