मराठी शाळा बंद करण्याची नामुष्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 09:58 PM2019-06-10T21:58:02+5:302019-06-10T21:58:23+5:30
महाराष्ट्रात सर्वच शाळांना ‘मराठी’ भाषा शिकविणे अनिवार्य करण्यात असा अशी भूमिका खुद्द मुख्यमंत्र्यांची सुध्दा आहे. राज्याच्या मायबोलीला तिचा मान मिळावा अशी अपेक्षा राज्यातील जनताही व्यक्त करीत आहे. असे असताना मात्र गोंदियात मराठी शाळांना अवकळा आली असून येथील एका मराठी शाळेला बंद करण्याची नामुष्की नगर परिषदेवर आली आहे. यामुळे एक मराठी शाळा बंद करून या शाळेतील विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजन करण्यात आले आहे.
कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्रात सर्वच शाळांना ‘मराठी’ भाषा शिकविणे अनिवार्य करण्यात असा अशी भूमिका खुद्द मुख्यमंत्र्यांची सुध्दा आहे. राज्याच्या मायबोलीला तिचा मान मिळावा अशी अपेक्षा राज्यातील जनताही व्यक्त करीत आहे. असे असताना मात्र गोंदियात मराठी शाळांना अवकळा आली असून येथील एका मराठी शाळेला बंद करण्याची नामुष्की नगर परिषदेवर आली आहे. यामुळे एक मराठी शाळा बंद करून या शाळेतील विद्यार्थ्यांचे अन्य शाळेत समायोजन करण्यात आले आहे.
प्रत्येकच राज्यातील आपली मायबोली असून त्या राज्यात त्याच भाषेचा सर्वाधीक वापर केला जातो. त्या राज्याचा सर्व कारभारही त्यांच्याच भाषेत होतो. शाळांमध्ये इंग्रजी विषयासह राज्याच्या मायबोलीचा विषय अनिवार्य असतो. आपल्या मायबोलीला एवढा मान देणे गरजेचे असतानाच तेवढे बंधनकारक करणे हे तेथील राज्य शासनाचे आद्य कर्तव्य आहे. असे असताना मात्र महाराष्ट्रात ‘मराठी’ भाषेला आपला मान गमवावा लागत आहे. आज मोठमोठ्या ग्रुप्सच्या खासगी शाळांची संख्या वाढली आहे. या शाळांत इंग्रजी भाषेचा वापर अनिवार्य असताना मराठी भाषेला मात्र दुय्यम स्थान दिले जात आहे. यामुळेच महाराष्ट्रात राहुनही येथील रहिवाशांना मराठी भाषा येत नाही ही खेदाची बाब आहे. याचाच फटका नगर परिषदेच्या शाळांनाही बसत आहे. नगर परिषदेकडून वर्ग एक ते चौथी पर्यंतच्या १० मराठी प्राथमिक शाळा चालविल्या जात होत्या. मात्र या खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे नगर परिषद शाळांचा ठाव लागत नसल्याने नगर परिषदेच्या शाळा धोक्यात येत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे पटसंख्ये अभावी नगर परिषदेला सिव्हील लाईन्स मराठी प्राथमिक शाळा बंद करावी लागली आहे. सुमारे ५ वर्षांपूर्वी ही शाळा बंद करण्यात आली असून येथील विद्यार्थ्यांंचे जवळील इंजीन शेड मराठी प्राथमिक शाळेत समायोजन करावे लागले आहे.
मराठी भाषेला बॉर्डरचा फटका
गोंदिया हे शहर राज्याच्या टोकावर असून छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्याला लागून आहे. शहरात मराठी भाषिकांच्या प्रमाणातच गुजराती, सिंधी व मारवाडी समाजबांधवांची संख्या आहे. मात्र हिंदी भाषिकांनी आपली भाषा सोडली नाही मात्र येथील मराठी भाषीक हिंदीत बोलायला लागले आहे. गोंदिया शहराची प्रथम भाषा हिंदी असून त्यानंतर मराठी भाषी मराठीचा वापर करीत आहेत. यामुळेही मराठी शाळा पोरक्या होत चालल्या आहेत. त्यामुळे हा क्रम बदलून मराठी भाषेला प्रथम प्राधान्य देण्याची गरज आहे.
आपल्या मायबोलीचा मान जपण्याची गरज
आपल्या मायबोलीला तिचा खरा मान मिळावा यासाठी मराठी भाषीकांनी मराठी भाषेचा वापर त्यांच्या दैनंदिन व्यवहारात केला पाहिजे.‘महाराष्ट्रीयन आहात तर मराठीतच बोला’ हे सूत्र अंमलात आणण्याची गरज आहे. शिवाय राज्य शासनाने तसे आदेश काढून राज्यातील प्रत्येकच शाळेत मराठी शिकविणे बंधनकारक करण्याची गरज आहे.