गोंदिया नागरी सहकारी संस्थेत चार कोटींचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:26 AM2021-01-22T04:26:38+5:302021-01-22T04:26:38+5:30
गोंदिया : येथील गोंदिया नागरी सहकारी संस्थेतील ३ कोटी ९३ लाख ४१ हजार ८५ रुपयांच्या अपहार प्रकरणानंतर फरार असलेल्या ...
गोंदिया : येथील गोंदिया नागरी सहकारी संस्थेतील ३ कोटी ९३ लाख ४१ हजार ८५ रुपयांच्या अपहार प्रकरणानंतर फरार असलेल्या संस्थासचिवाला पोलिसांनी अटक केली आहे.याप्रकरणी शहर पोलिसांत १२ जून २०१९ रोजी गुन्हा नोंद झाला आहे.
येथील गोंदिया नागरी सहकारी संस्थेत ठेवीदारांनी वेगवेगळ्या प्रकारे ठेवलेल्या ठेवींच्या स्वरूपातील रोख ३ कोटी ९३ लाख ४१ हजार ८५ रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले होते. संस्थाध्यक्ष पुरनलाल मोटूराम भाजवानी, उपाध्यक्ष महिनादेवी गोविंदराम लोगानी, सचिव सागर रामचंद्र गलानी व इतर ९ संचालक-व्यवस्थापकांनी संगनमत करून हा घोटाळा केल्याप्रकरणी लेखापरीक्षक फिर्यादी अनिरुद्ध प्रभाकर जोशी (वय ४९) यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत १२ जून २०१९ रोजी भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७२, २०१, ४०६, १२० (ब) सहकलम ३, ४ महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण करणेबाबत अधिनियम- १९९९ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत होती. या तपासादरम्यान, अपहारप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यापासून फरार असलेल्या संस्थासचिव सागर गलानी (वय ३९,रा.आदर्श कॉलनी) यास पोलिसांनी १६ जानेवारी रोजी अटक केली. त्याला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
------------------------
कागदपत्रे जमा करून जबाब नोंदवा
या संस्थेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर ठेवीदारांनी त्यांच्या ठेवींच्या मागणीबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे विहित नमुन्यात अर्ज केले आहे. मात्र, ज्यांनी पासबुक, आधारकार्ड, ठेवींचे प्रमाणपत्र, बॉंड व संबंधित इतर कागदपत्रे जमा केले नाही, अशांनी आर्थिक गुन्हे शाखेत संबंधित कागदपत्रे जमा करून आपला जबाब नोंदवावा, असे कळविण्यात आले आहे.