सिंचन क्षमता वाढविण्यावर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:03 AM2021-09-02T05:03:28+5:302021-09-02T05:03:28+5:30
गोंदिया : जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण करून, तसेच काही सिंचन प्रकल्पांची दुरुस्ती करून गोंदिया-भंडारा जिल्ह्यांतील सिंचन क्षमता वाढविण्यावर ...
गोंदिया : जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण करून, तसेच काही सिंचन प्रकल्पांची दुरुस्ती करून गोंदिया-भंडारा जिल्ह्यांतील सिंचन क्षमता वाढविण्यावर भर द्या. रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती दिल्यास शेतकऱ्यांना त्याची मदत होईल. त्यामुळे या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करा, अशी सूचना खा. प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी (दि.१) मुंबई येथे आयोजित आढावा बैठकीत केली.
जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्रालय मुंबई, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांतील जलसंपदा विभागाच्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व खा. प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत बुधवारी सह्याद्री अतिथिगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या दोन्ही जिल्ह्यांतील सिंचनाच्या सोयी-सुविधा त्वरित पूर्ण व्हाव्यात याकरिता अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांतील धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२ चे पाणी चोरखमारा व बोदलकसा तलावात सोडणे, धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-३ चा निर्मितीत मंगेझरी, कटंगी, कालपाथरीसहित अन्य तलावात पाणी सोडून सिंचन क्षमता वाढविणे, सुरेवाडा उपसा सिंचन, लिफ्ट एरिगेशनवर पम्प हाउस निर्माण करणे, गणेशपूर लिफ्ट एरिगेशन तयार करून बावनथडी प्रकल्पाचा उजव्या मुख्य कालव्याचे वितरिका निर्माण करणे, चुलबंध मध्य प्रकल्प डावा कालवा, धारगाव उपसा सिंचन, चांदपूर जलाशयातील कॅनॉल दुरुस्ती करून सिंचन वाढविण्यासाठी इतर सिंचनाच्या बाबतीतसुद्धा सूचना खा. प्रफुल्ल पटेल, आ. राजू कारेमोरे, आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी ना. जयंत पाटील यांच्यासमोर मांडल्या. यावर ना. पाटील यांनी सर्व प्रकल्पांची प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.