आंदोलनाच्या इशारानंतर कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 10:08 PM2019-07-17T22:08:57+5:302019-07-17T22:09:12+5:30
येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत होती. त्यामुळे गावकऱ्यांनी रिक्त पदे त्वरीत न भरल्यास १६ जुलैला रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी व ३ कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती या रुग्णालयात केली. तसेच रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले त्यामुळे गावकऱ्यांनी तात्पुरते मागे घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवेगावबांध : येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत होती. त्यामुळे गावकऱ्यांनी रिक्त पदे त्वरीत न भरल्यास १६ जुलैला रुग्णालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी व ३ कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती या रुग्णालयात केली. तसेच रिक्त पदे भरण्याचे आश्वासन दिले त्यामुळे गावकऱ्यांनी तात्पुरते मागे घेतले.
येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, दोन वैद्यकीय अधिकारी, चार अधिपरिचारिका व एक औषध निर्माता या रिक्त जागा त्वरीत भरण्याची मागणी सरपंच अनिरुद्ध शहारे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सतिश कोसरकर व गावकºयांनी जिल्हा शल्यचिकित्सक, पालकमंत्री व आरोग्य उपसंचालक यांना लेखी निवेदन देऊन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मंगळवारी ग्रामीण रुग्णालयाच्या स्थानिक प्रशासनाने आंदोलकांना चर्चेसाठी रुग्णालयात बोलाविले होते. एक अधिपरिचारिका चंदा क्षीरसागर, औषध निर्माता आभा उजवणे यांची सेवा संलग्न करण्यात आली आहे. येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्पित पालीवाल यांना वैद्यकीय अधीक्षकांचा प्रभार देण्यात आला.
ग्रामीण रुग्णालय देवरीवरुन वैद्यकीय अधिकारी डॉ. हंसराज हेडाऊ व अर्जुनी मोरगाव येथून डॉ. प्रणाली टेकाम यांना प्रतिनियुक्तीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अर्पित पालीवाल यांनी शिष्टमंडळाला दिली.
ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथील अधिपरिचारिका सकाळी ८ ते २ वाजेपर्यंत या रुग्णालयात सेवा देणार असल्याचे सांगितले. पर्यायी व्यवस्था केल्यामुळे आंदोलकांनी समाधान व्यक्त केले. परंतु रिक्त पदांची पुर्ततेच्या मागणीवर आंदोलक ठाम होते.
रिक्त पदांची पुर्तता न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
शिष्टमंडळात सरपंच अनिरुद्ध शहारे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सतिश कोसरकर, नवल चांडक, विलास कापगते, संजीव बडोले, बाबुराव नेवारे, विजय संग्रामे, रेवचंद शहारे यांचा समावेश होता. या वेळी आयुषचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लोथे, डॉ. रुपेश कापगते, सहायक अधीक्षक रंगारी, ठाणेदार किशोर पर्वते उपस्थित होते.
या रुग्णालयात एक अधिपरिचारिका, औषध निर्माता व दोन वैद्यकीय अधिकाºयांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले आहे. अजून दोन्ही वैद्यकीय अधिकारी रुजू व्हायचे आहेत. ही तात्पुरती मलमपट्टी झाली. रिक्त पदे भरण्याचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे आंदोलनावर आम्ही ठाम आहोत. जिल्हा शल्यचिकित्सकांनी रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा करावा.
-सतीश कोसरकर,
सदस्य रुग्ण कल्याण समिती