रोहयोतून ११७५० कुटुंबांना रोजगार
By admin | Published: June 4, 2017 12:51 AM2017-06-04T00:51:18+5:302017-06-04T00:51:18+5:30
मागेल त्याला काम व कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सडक-अर्जुनी तालुक्यात यशस्वी ठरली आहे.
सडक -अर्जुनी तालुका : विविध प्रकारची कामे सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागेल त्याला काम व कामानिमित्त होणारे स्थलांतर रोखण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सडक-अर्जुनी तालुक्यात यशस्वी ठरली आहे. या योजनेअंतर्गत ५० दिवसांमध्ये सडक-अर्जुनी तालुक्यातील ११ हजार ७५० कुटुंबांना रोजगार उपलब्ध करु न देण्यात आला. विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मजुरांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मजुरांना रोजगार मिळणे ही बाब आम असली तरी यात बहुतांश आदिवासी बांधव तसेच शेतकरी बांधव सुध्दा रोजगारासाठी रोहयोच्या कामावर असल्याचे समजते.
उन्हाळी धान हंगाम अंतिम टप्प्यात असतांनाच तालुक्यातील मजुरांना कामे उपलब्ध होत नाहीत. अशा स्थितीत या मजुरांकडून रोजगार हमी योजनेची कामे सुरु करण्याची मागणी सातत्याने करण्यात आली. संबंधितांना यातून रोजगार उपलब्ध करु न देण्यात आला. ग्रामपंचायतीकडून मजुरांचे जॉब कार्ड मागविण्यात आले. या आधारावर सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात रोजगार हमी योजनेअंतर्गत १४ हजार ७५० मजुरांची नोंदणी करण्यात आली. एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्षरित्या ११ हजार ७५० कामावर असलेल्या मजुरांना मजूरीपोटी तीन कोटी १६ लक्ष रु पये अदा करण्यात आले. सर्व मजुरांची मजूरी त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात आली. या प्रणालीत आधारकार्डची भूमिका महत्वाची ठरली आहे.
विशेष म्हणजे गाळमुक्त तलावाच्या २३ कामांवर पाच हजार ३१२ मजूर उपस्थित आहे. डासमुक्त तालुक्याचे काम सहा ग्रामपंचायतींनी हाती घेतले असून ५८ कामांवर २३४ मजूर उपस्थित आहे. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून वृक्ष लागवडीचे काम सुध्दा हाती घेण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर खड्डे खोदकाम सुरु आहे.
अशी आहेत कामे
तालुक्यात रोहयोंतर्गत विविध प्रकारची कामे सुरू आहेत. यात तलाव खोलीकरणाच्या २३ कामांवर पाच हजार ३१२ मजूर, पांदन रस्ताच्या १३ कामांवर दोन हजार ४१९ मजूर, भातखाचरच्या २३ कामांवर ६७५ मजूर, सिंचन विहिरीच्या दोन कामांवर ३४ मजूर, गुरांच्या गोठ्याच्या तीन कामांवर ५४ मजूर, वैयक्तीक शौचालयांच्या २६ कामांवर १३८ मजूर, घरकूलच्या १६ कामांवर ६४ मजूर. दररोज एकूण १०६ कामांवर आठ हजार ६९६ मजुरांची उपस्थिती आहे.