नियोजनशून्यतेमुळे विद्यार्जन धोक्यात
By admin | Published: July 30, 2015 01:32 AM2015-07-30T01:32:24+5:302015-07-30T01:32:24+5:30
सडक अर्जुनी तालुक्यात सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून बहुतांश गावात वर्गखोल्या बांधण्यात आल्या.
वर्गखोल्यांमध्ये गळती : संगणक झाले उंदरांचे घर, शालेय गुणवत्तेबाबत शिक्षकांसह अधिकारीही उदासीन
वाताहत शिक्षणाची
राजेश मुनिश्वर सडक अर्जुनी
सडक अर्जुनी तालुक्यात सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून बहुतांश गावात वर्गखोल्या बांधण्यात आल्या. मात्र पंचायत समितीमधील संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे तालुक्यातील कनेरी/राम, धानोरी, सौंदड, डुग्गीपार आदी ठिकाणी विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी टपकत आहे. त्यामुळे वर्गात चांगले बसणेच शक्य नाही तर विद्यार्जन कसे करायचे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.
चार वर्षापूर्वी सर्वशिक्षा अभियानांतर्गत कनेरी येथे षटकोणी वर्गखोली बांधण्यात आली. ती वर्गखोली पावसाळ्यात नेहमीच गळत असते. त्यामुळे टपकणाऱ्या पाण्यापासून बचावासाठी विद्यार्थ्यांना बेंच सरकवून बसावे लागते. टपकलेल्या पाण्याचे डबके वर्गखोलीतून साचून त्याचे लोट वाहताना दिसत आहेत. ओल्याचिंब वर्गखोलीत बसून विद्याग्रहण करताना मुलांची तारेवरची कसरत होत आहे. यातूनच अनेक जण आजारी पडत आहेत.
काही शाळेत नवीन वर्गखोल्या नसल्यामुळे धोकादायक असलेल्या शाळा इमारतीत विद्यार्थी जीव मुठीत घेवून बसत आहेत. कवेलूची इमारत आहे. त्याचा लोखंडी खांब सडल्याने छताला मोठे भगदाड पडले आहे. त्याच जुन्या इमारतीला ठिकठिकाणी भेगा गेल्या आहेत. त्या भेगांमधून पावसाळ्यात सापासारखे विषारी सरपटणारे प्राणी कधीही आत येऊ शकतात. यातून एखादी अप्रिय घटना घडली तर जबबादार कोण? असा प्रश्न निर्माण होतो.
पोषण आहाराचे गौडबंगाल
सडक अर्जुनी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ११७ आहेत. जिल्हा परिषद हायस्कुल सौंदड, सडक अर्जुनी या ठिकाणी आहेत. शासकीय आश्रमशाळा शेंडा येथे आहे. शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून मुलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. पण आहारात महिन्यातून एकदा तरी अंडी दिली पाहिजे असे नियमावरील नमूद असताना ती प्रत्यक्षात दिलीच जात नाही. बिलात मात्र अंडी दिल्याचे नमूद करून बोगस बिले जोडली जातात.
पंचायत समितीचा एक जबाबदार अधिकारी तर केवळ बांधकाम सुरू असलेल्या शाळांनाच भेटी देत आहे. मात्र शालेय गुणवत्तेविषयी साधी विचारपूसही करीत नसल्याची खमंग चर्चा सुरू आहे. ‘जिथे बांधकाम तिथेच भेटी’ असे समीकरण सुरू आहे.
शौचालयांची दुरवस्था
तालुक्यातील बहुतेक सर्वच शाळांमध्ये शौचालयाची सुविधा केली आहे. पण शिक्षकांचे नियोजन नसल्यामुळे बहुतेक शौचालय निकामी पडल्याचे दिसत आहे. शौचालयाकडे जाण्याच्या मार्गावर गवताचे कुरण वाढल्याने मुलांना तिथे जाताच येत नाही. काही ठिकाणी स्वच्छता नसल्यामुळे मुले बाहेरच जाणे जास्त पसंत करतात. या गंभीर बाबीकडे मुख्याध्यापकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
शाळेतील संगणक वाऱ्यावर
तालुक्यातील २८ ते ३० शाळांमध्ये शासनाच्या माध्यमातून संगणकाचा पुरवठा करण्यात आला. पण मुख्याध्यापक व शिक्षकांच्या ढिसाळ नियोजनामुळे बहुतेक संच आता उंदरांचे घर बनले आहे. योजना चांगल्या असतात, पण राबविणारी यंत्रणा बरोबर नसली म्हणजे त्या योजनेचे कसे तीनतेरा वाजतात याचे उत्कृष्ट उदाहरण येथे पहायला मिळते. अनेक ठिकाणी तर शासनाने संगणक दिले पण विजेची सोय केली नाही. संगणक दिलेल्या सर्वच शाळांना मोफत वीज पुरवठा करणे तितकेच महत्वाचे आहे.
शैक्षणिक गुणवत्तेची फिकीर कोणाला?
तालुक्याच्या शिक्षण विभागात आता चांगलाच खेडखंडोबा होत आहे. दुपारच्या शाळेला चक्क ११.३० वाजता शाळेत जाणारे आणि ४ वाजता परत गावाकडे निघून जाणारे शिक्षक कमी नाहीत. बहुतेक शिक्षक तर भंडारा, लाखणी, साकोली, गोंदिया, देवरी, अर्जुनी मोरगाववरुन ये-जा करताना दिसतात. सायंकाळी ४ वाजेपासून कोहमारा या बस स्थानकावर शिक्षक प्रवाशांची गर्र्दी वाढताना दिसते. या अप-डाऊनमुळे खरेच मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढेल का? हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.