विद्यार्थ्यांची प्रतिभा ओळखून प्रोत्साहित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:04 PM2018-01-10T23:04:47+5:302018-01-10T23:09:11+5:30
प्रतिभा ही केवळ शहरी विद्यार्थ्यांमध्येच असते असे नाही तर ग्रामीण भागातही आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांतून अनेक विद्यार्थी घडले. आजही उच्चपदावर असलेले बहुतांशी विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : प्रतिभा ही केवळ शहरी विद्यार्थ्यांमध्येच असते असे नाही तर ग्रामीण भागातही आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांतून अनेक विद्यार्थी घडले. आजही उच्चपदावर असलेले बहुतांशी विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकले. त्यामुळे जि.प.च्या शाळा सर्वोत्तम आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांनी केवळ आकर्षणाकडे न जाता पाल्यांना जि.प.च्या शाळांमध्ये शिक्षण द्यावे, असे आवाहन नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त आर.एच. ठाकरे यांनी केले.
जिल्हा परिषद हायस्कुल तथा जि.प. प्राथमिक शाळा क्र. २ अर्जुनी-मोरगावच्या त्रिदिवसीय स्रेहसंमेलनाचे उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर, मार्गदर्शक म्हणून प्रशांत गाडे, नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे, पं.स.उपसभापती आशा झिलपे, शाळा समितीचे अध्यक्ष व जि.प. सदस्य गिरीश पालीवाल, देवेंद्र रहेले, जि.प. सदस्य मंदा कुंभरे, गटविकास अधिकारी एन.आर. जमईवार, गटशिक्षणाधिकारी टी.बी. भेंडारकर, प्राचार्य डी.के. मस्के, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी.एस. कापगते, शाळा समिती सदस्य अॅड. राजेश पालीवाल, शंकर लोधी, विजय पशिने, प्रतिभा नाकाडे, शाळा नायक सुशांत तागडे, नंदीनी मेश्राम उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, विद्यार्थ्यांना घडविण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांची आहे. शैक्षणिक अडचणी आहेत. यातून मार्ग काढत जे कमी असेल ते पूर्ण करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करा. विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यावर शिक्षकांनी लक्ष केंद्रीत केले पाहिजे.
विद्यार्थ्यांमध्ये पुढे येवून बोलण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांची पारख करुन त्यांचा ज्याकडे अधिक कल दिसतो त्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रशांत गाडे म्हणाले हे स्पर्धेचे युग आहे. भविष्य घडविण्यासाठी विविध दालने खुली आहेत.
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी अगदी शालेय शिक्षण सुरू असतानाच केली पाहिजे. स्पर्धात्मक परीक्षेची पुस्तके वाचनापेक्षा स्वत:ला प्रश्न पडली पाहिजेत. ज्यांना प्रश्न पडत नाहीत ते यशस्वी होत नाही. विद्यार्थ्यांना प्रत्येक बाब जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. यातूनच जिज्ञासा व चिकित्सक बुद्धी वाढत असल्याचे म्हणाले.