बनगाव येथे अतिक्रमण हटाव मोहीम

By admin | Published: July 14, 2017 01:09 AM2017-07-14T01:09:46+5:302017-07-14T01:09:46+5:30

तालुक्यातील सर्वात मोठे गणल्या जाणारे चिकन-मटन मार्केटमधील वेस्टेजमुळे नागरिकांना आरोग्याची समस्या भेडसावत होती.

Encroachment Removal Campaign at Banagaon | बनगाव येथे अतिक्रमण हटाव मोहीम

बनगाव येथे अतिक्रमण हटाव मोहीम

Next

मटन-चिकनच्या दुकानांना बंदी : नागरिकांनी केली होती आयुक्ताकडे तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
आमगाव : तालुक्यातील सर्वात मोठे गणल्या जाणारे चिकन-मटन मार्केटमधील वेस्टेजमुळे नागरिकांना आरोग्याची समस्या भेडसावत होती. या मार्केटला स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून बंद करण्यात यावे, यासाठी नागरिकांनी लढा उभारला होता. लोकमतमध्ये नागरिकांच्या या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. या सर्व बाबींची दखल घेऊन बनगाव ग्रामपंचायत व बाजार समितीने या दुकानांचे अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे.
आमगाव येथील बाजार समितीच्या हद्दीत बनगाव रस्ते परिसरात कोंबडी व मटन व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करुन दुकाने थाटली आहेत.
या दुकानांच्या उघड्या वेस्टेजमुळे नागरिकांना रहदारीला आळा बसला होता. तर दुकानात कापलेल्या मटन-चिकनचे वेस्टेज लोकवस्तीत पसरत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.
बाजारपेठमधील मटन व चिकनची दुकाने अतिक्रमण हटविण्यासाठी नागरिकांनी कृषी उत्पन्न बाजार समिती व ग्रामपंचायत यांना निवेदन दिले होते. नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असल्याने ग्रामपंचायत व बाजार समिती प्रशासनाने अतिक्रमणात असलेले कोंबडी व मटन मार्केट हटाव मोहीम गुरुवारी (दि.१३) सुरू केली.
यावेळी तणाव निर्माण होऊ नये यासाठी तहसीलदार साहेबराव राठोड, पोलीस निरीक्षक एस. दासुरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमदार केशवराव मानकर, उपसभापती रविदत्त अग्रवाल, सरपंच सुषमा भुजाडे यांनी समन्वयाची भूमिका घेत अतिक्रमणीत दुकान चालकांना स्वमर्जीने दुकाने हलविण्याचे निर्देश दिले. या वेळी अनेक दुकानदारांनी आपले अतिक्रमण स्वत:हून काढून घेतले.
यावेळी अस्वच्छता व नागरिक वस्तीच्या तक्रारीची दखल व्हावी यासाठी बाजार समितीचे सचिव सुभाष चव्हाण यांनी शासनाचे दिशानिर्देश समजावून सांगितले. याप्रसंगी पोलीस प्रशासन व महसूल विभागाच्या समन्वयाने अतिक्रमण मोहीम पूर्ण करण्यात आली.

Web Title: Encroachment Removal Campaign at Banagaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.