ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर शहरवासीयांचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:28 AM2021-05-14T04:28:12+5:302021-05-14T04:28:12+5:30
नवेगावबांध : ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर गर्दी कमी राहात असल्याने शहरातील अनेक जण या केंद्रांवर लसीकरणासाठी गर्दी करीत आहेत. ...
नवेगावबांध : ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर गर्दी कमी राहात असल्याने शहरातील अनेक जण या केंद्रांवर लसीकरणासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर शहरवासीयांचे अतिक्रमण होत असल्याचे चित्र आहे.
ज्यांच्याकडे ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल आहेत ते नोंदणी करतात. पण, तालुक्यात बहुसंख्य असेही युवक व नागरिक आहेत, की जे अल्पशिक्षित आहेत. त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे ते लसीकरणासाठी नोंदणी करू शकत नाहीत. ही लसीकरणात एक अडचण येत आहे. त्यामुळे तालुक्यातील १८ ते ४४ वर्षे वयोगटातील युवक व नागरिकांसाठी ५० टक्के ऑफलाईन लसीकरणाची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. ग्रामीण आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थीसुद्धा अँड्रॉइड मोबाइलअभावी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले होते. तालुक्यातील आजही बहुसंख्य लोकांजवळ अँड्रॉइड मोबाईलची सुविधा नाही. कुठे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागातील १८ वर्षे वयावरील युवक व नागरिक अँड्रॉइड मोबाईलअभावी लसीकरणासाठी नोंदणी कशी करणार?
दुसऱ्या तालुक्यातील व्यक्ती दूरवरून येऊन लसीकरण सुविधेचा लाभ घेत आहेत. स्थानिकांना तालुक्यातच लस सुविधा मिळण्यासाठी तालुकास्तरावरील प्रत्येक केंद्रावर उपलब्ध लस साठ्यापैकी ५० टक्के ऑनलाईन व ५० टक्के ऑफलाईन अशी लस नोंदणी व्हावी, जेणेकरून स्थानिकांची आपल्याच तालुक्यात लस नोंदणी करताना अडचण येणार नाही. युवक, नागरिकांमध्ये गोंधळ कमी होऊन, लसीकरण सुविधा सुरळीत चालेल.
......
माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. मी लसीकरणासाठी कशी नोंदणी करणार? कुणाला करून मागणार? त्यामुळे सरकारने आमच्यासाठी काहीतरी सोय करून दिली पाहिजे.
- संतोष सयाम, बोरटोला.
...........
लस घेतली पाहिजे असे वाटते. पण, ऑनलाईन नोंदणी करावी लागते. त्याकरिता अँड्रॉइड मोबाईल लागतो, तो माझ्याकडे नाही. ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय लस मिळणार नाही. मग मी काय करावे?
ऑनलाईन नोंदणी न करता लस मिळाल्यास ती मी नक्की घेईन.
-नितीन राऊत, नवेगावबांध.
...........
आपल्या ग्रामीण भागात बऱ्याच नागरिकांकडे अँड्रॉइड मोबाईलची सुविधा नाही. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील युवक व नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीकरिता ऑनलाईन नोंदणी करू शकत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने लसीकरण केंद्रांवर ५० टक्के ऑफलाईन नोंदणी करावी, शिवाय ऑनलाईन नोंदणीसाठी गावात पर्यायी व्यवस्था करावी. - रामदास बोरकर,