ग्रामीण विद्यार्थ्यांच्या राखीव जागेवर शहरी विद्यार्थ्यांचे झाले अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 05:00 AM2021-10-09T05:00:00+5:302021-10-09T05:00:12+5:30
नगर परिषद व नगरपंचायत हे शहरी क्षेत्र असताना त्या क्षेत्रातील शाळांचे मुख्याध्यापक शाळा ग्रामीण भागात असल्याचे प्रमाणपत्र देत आहेत. तसेच प्रशासनाचा कणा असलेले महसूल विभागाचे तहसीलदार, मंडळ अधिकारी हे सुद्धा त्या प्रमाणपत्रांना प्रमाणित करीत असल्याची पालकांत चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाला ग्रामीण आणि शहरी फरक कळत नाही की, सर्व हेतुपुरस्सर केले जात आहे, हा संशोधनाचा विषय आहे. या अक्षम्य चुकीमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचा अधिकार हिरावून त्यांच्यावर अन्याय होत असल्याची ओरड आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक-अर्जुनी : नवोदय विद्यालय निवड समितीद्वारे कोरोना काळात शासकीय नियमांचे पालन करीत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ११ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल २८ सप्टेंबर रोजी घोषित करण्यात आला. मात्र, या निकालानंतर भलतीच बाब पुढे आली असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जागेवर शहरी भागातील विद्यार्थ्यांनी अतिक्रमण केल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
नवोदय विद्यालयासाठी इयत्ता सहावीत निवड झालेल्या तात्पुरत्या निवड यादीचे निरीक्षण केले असता शहरी क्षेत्रातील फक्त एकच विद्यार्थ्याची निवड झाली आहे. म्हणजेच एकूण ८० जागांपैकी १ म्हणजे १.२५ टक्के विद्यार्थ्याची निवड झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा या दोन नगर परिषदा आणि गोरेगाव, देवरी, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी, सालेकसा या नगरपंचायत शहर क्षेत्रात मोडतात. या क्षेत्रात अनेक नामांकित शाळा असून तेथील काही विद्यार्थ्यांची निवड ‘ग्रामीण विद्यार्थी’ म्हणून केली आहे. याचाच अर्थ, या विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षेचे प्रवेश अर्ज करताना ग्रामीण विद्यार्थी अशी दिशाभूल करणारी माहिती दिली आहे.
नगर परिषद व नगरपंचायत हे शहरी क्षेत्र असताना त्या क्षेत्रातील शाळांचे मुख्याध्यापक शाळा ग्रामीण भागात असल्याचे प्रमाणपत्र देत आहेत. तसेच प्रशासनाचा कणा असलेले महसूल विभागाचे तहसीलदार, मंडळ अधिकारी हे सुद्धा त्या प्रमाणपत्रांना प्रमाणित करीत असल्याची पालकांत चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाला ग्रामीण आणि शहरी फरक कळत नाही की, सर्व हेतुपुरस्सर केले जात आहे, हा संशोधनाचा विषय आहे. या अक्षम्य चुकीमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचा अधिकार हिरावून त्यांच्यावर अन्याय होत असल्याची ओरड आहे.
पालक जाणार न्यायालयात
nयापूर्वी नवोदय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करताना शाळेकडून माहिती प्रमाणित करूनच माहिती अपलोड केली जायची; परंतु यावेळी कोरोनाच्या कारणामुळे सत्र २०२१-२२ मधील इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी अर्ज करताना विद्यार्थी-पालकांना शाळेकडून माहिती प्रमाणित करण्याची गरज नव्हती. त्यामुळे पालकांनी आपल्या सोयीनुसार शाळेचे ग्रामीण-शहरी क्षेत्र निवडल्याचे निदर्शनास येते. जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष असतात, त्यांनी या बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पालक रामगोपाल बाहेकर, तुलसीदास रामटेके, अरविंद कटारे व इतर पालकांनी केली आहे. अन्यथा न्याय मागणीसाठी न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असे काही ग्रामीण भागातील पालकांनी सांगितले.
उद्देशालाच हरताळ
nमाजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी १९८६ मध्ये ग्रामीण भागातील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी म्हणून नवोदय विद्यालयाची सुरुवात केली ; परंतु २०२१-२२ च्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या यादीत ग्रामीण विद्यार्थ्यांना ७५ टक्के राखीव जागा उपलब्ध होऊ शकत नाही. हे, दुर्दैवच म्हणावे लागेल. ग्रामीण व शहरी क्षेत्रातील अनेक पालकांनी निवड यादीतील विद्यार्थ्यांचे कागदपत्रे व वास्तव तपासायला सुरुवात केली आहे. यामध्ये खोटी माहिती भरणाऱ्यांना निवड प्रक्रियेतून वगळावे, अशी मागणी केली आहे.
शहरी विद्यार्थ्यांची ग्रामीण क्षेत्रातून निवड
nनवोदय विद्यालय समितीच्या नवोदय प्रवेश नियमानुसार एखादा विद्यार्थी इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी या तीन सत्रांपैकी एक दिवस जरी शहरी भागातील शाळेत शिकला असेल तर, त्याची शहरी विद्यार्थी म्हणून गणना होते ; परंतु या निवड यादीतील काही विद्यार्थी नगर परिषद, नगरपंचायत क्षेत्रातील शाळेत शिकून सुद्धा त्यांची निवड ग्रामीण क्षेत्रातून केल्याचा पालकांचा आरोप आहे.