तंत्रशुद्ध शेती करुन शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 11:38 PM2018-11-01T23:38:14+5:302018-11-01T23:39:58+5:30

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. शेतीमध्ये सुद्धा पीक घेण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. पारंपारिक धान शेतीसोबत ऊस, भाजीपाल्यासारख्या रोख पिकांकडे वळावे.

Enriched farming by making skilled farming | तंत्रशुद्ध शेती करुन शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे

तंत्रशुद्ध शेती करुन शेतकऱ्यांनी समृद्ध व्हावे

googlenewsNext
ठळक मुद्देमनोहर चंद्रिकापुरे : ग्राम गोंगले येथील शेतकरी मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. शेतीमध्ये सुद्धा पीक घेण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. पारंपारिक धान शेतीसोबत ऊस, भाजीपाल्यासारख्या रोख पिकांकडे वळावे. आज जागतिक बाजारपेठेत स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी तंत्रशुद्ध शेतीचा अवलंब करुन आर्थिक समृद्ध व्हावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे जिल्हा किसान अध्यक्ष व सेवानिवृत्त कृषी अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
येथील अ‍ॅग्रीकोज वेलफेअर सोसायटीच्यावतीने मंगळवारी (दि.३०) ग्राम गोंगले येथील कालाबाबा मंदिराच्या मैदानात आयोजीत शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य व गटनेते गंगाधर परशुरामकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचे माजी संशोधक डॉ. शिवाजी सरोदे, कृषी महाविद्यालय अकोल्याचे सेवा निवृत्त प्राचार्य विजय गोलीवार, माजी विभागीय व्यवस्थापक अर्जुन गुगल, माजी कृषी अधिकारी गजानन देवळीकर, अ‍ॅड. सुरेश देशपांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. अविनाश काशीवार, सरपंच इंजिनिअर डी.यू. रहांगडाले, विजय तपाडकर, हरि भांडारकर, आर.व्ही.तलांजे, प्रमोद पांढरे, राकेश कळमकर, रमेश शिवणकर प्रामुख्याने उपस्थित होते. चंद्रीकापुरे म्हणाले आपल्या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय महामार्ग व लोहमार्ग असल्याने जगाच्या बाजारपेठेत आपल्या पिकाची विक्री व्हावी. आपले स्थान निर्माण होण्यासाठी शेतकºयांनी कंबर कसावी. यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञानाचे मेळावे आयोजन करुन शेतकºयांसाठी आपण समर्पित आहोत. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर रोख पीक घेण्यासाठी आपल्याकडे समृद्ध वातावरण आहे. हवा योग्य आहे, माती व पाणी सुद्धा योग्य प्रमाणात असून त्यांचे शेतमाल परदेशात निर्यात होतात ती स्थिती आपण सुद्धा निर्माण करु शकतो.
फक्त आपण आपली मानसिकता तयार केली पाहिजे. सध्या आपल्या भागात अ‍ॅप्पल बोर, ऊस, भाजीपाला, केळी, डाळींब, कांदा व पपईसारखे पीक धानासोबत घेतले जात आहे. यामध्ये तांत्रिक बाबीचा अवलंब होऊन यातून गुणवत्तेचे रोख पीक निघाल्यास आपला माल शहरात किंवा बाहेर देशात सुद्धा निर्यात होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला.
परशुरामकर यांनी, धानावर दिवसेंदिवस विविध रोगांचे आक्रमण होत आहे. त्यामुळे आता आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी रोख पिकांकडे वळणे अगत्याचे झाले असल्याचे सांगीतले. डॉ. सरोदे यांनी किड व रोगासंबंधी, गोलीवार यांनी भाजीपाला व फळपिके उत्पादन, गुगल यांनी शेतपिकांसाठी कर्ज, देवळीकर यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना, अ‍ॅड. देशपांडे यांनी शेतकऱ्यांना कायदेविषयक माहिती दिली. संचालन सेवानिवृत्त कृषी अधिकारी एफ.आर.टी. शहा यांनी केले तर आभार सरपंच रहांगडाले यांनी मानले.

Web Title: Enriched farming by making skilled farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती