संविधानिक मूल्य जनजागृतीवर वेबिनार उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:54 AM2021-03-04T04:54:44+5:302021-03-04T04:54:44+5:30
गोंदिया : इक्वल अपॉर्च्युनिटी सेन्टर व अनु.जाती, अनु.जनजाती इतर मागास वर्ग तक्रार निवारण समिती, धोटे ...
गोंदिया : इक्वल अपॉर्च्युनिटी सेन्टर व अनु.जाती, अनु.जनजाती इतर मागास वर्ग तक्रार निवारण समिती, धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय आणि संविधान फाउंडेशन यांच्या संयुक्त वतीने संविधानिक मूल्य जनजागृती या विषयावर एक दिवसीय वेबिनारचे आयोजन २८ फेब्रुवारी करण्यात आले होते.
उद्घाटन धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.अंजन नायडू यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्य मार्गदर्शक म्हणून माजी सनदी अधिकारी ई.झेड.खोब्रागडे, संविधान फाउंडेशनचे कार्यवाहक डाॅ.महेंद्रकुमार मेश्राम, आय.क्यू.ए.सीचे समन्वयक डाॅ.दिलीप चौधरी व कार्यक्रमाचे संयोजक प्रा. धर्मवीर चव्हाण उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.नायडू यांनी, संविधानिक मूल्य प्रत्येक भारतीयांसाठी किती महत्त्वाची आहेत, तसेच देशाची अखंडता व एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे असणारे योगदान अधोरेखित केले.
प्रास्ताविकातून डाॅ.चौधरी यांनी, महाविद्यालयात जातीधर्माच्या आधारावर कुठेही भेदभाव होत नाही, तसेच संविधानिक मूल्यांची जनजागृती व ही मूल्य विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये रुजविण्यासाठी माही कटिबद्ध आहोत, असे मत मांडले, तसेच महाविद्यालयात सर्वांना सामान संधी मिळावी, म्हणून स्थापन करण्यात आलेल्या इक्वल अपॉर्च्युनिटी सेंटरची माहिती सर्वांना दिली.
डॉ.मेश्राम यांनी, संविधान फाउंडेशनचे उद्देश व उपक्रमाची माहिती दिली. खोब्रागडे यांनी, संविधानिक मूल्य जोपासणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे आणि या संविधानिक मूल्यांचा जागर धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी करीत आहे, असे सांगत महाविद्यालयाचे कौतुक केले.
त्यांनी संविधानिक मूल्य समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. भारतीय राज्यघटना देशातील सर्व नागरिकास सामाजिक आणि आर्थिक न्यायाची संधी देण्यास व्यवस्थेला कटिबद्ध करते. सामाजिक प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीस सामान संधी मिळणे गरजेचे आहे. ही सामान संधी प्रयेकाला मिळण्यासाठीच सामाजिक न्यायाच्या रूपानेच सामाजिक आणि शैक्षणिक मागास व्यक्ती समूहासाठी संवैधानिक आरक्षण आहे, हे सांगितले. भारतीय राज्यघटना प्रत्येक व्यक्तीस विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य देते, तसेच प्रत्येक व्यक्तीस तो कोणत्याही धर्माचा व जातीचा असो, त्याला दर्जाची व संधीची समानता व व्यक्तीची प्रतिष्ठा प्राप्त करून देते, असे सांगितले.
प्रा.चव्हाण यांनी, इक्वल अपॉर्च्युनिटी सेंटर व अनु.जाती, अनु.जनजाती इतर मागास वर्ग तक्रार निवारण समितीचे उद्देश व उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली. या कार्यक्रमात २०० विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता. कार्यक्रमासाठी प्रा.संजय तिमांडे, डाॅ. आनंद मोरे, डाॅ.किशोर हातझाडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.