पर्यावरणज्ञान मंजुषा सत्कार व बक्षीस वितरण
By admin | Published: February 22, 2016 02:00 AM2016-02-22T02:00:02+5:302016-02-22T02:00:02+5:30
त्रिपुर सुंदरी गडमाता मंदिर समिती आमगाव खुर्द, श्री सत्संग विठ्ठल रुख्मिणी मंदिर समिती व श्री सत्संग लहरी महाराज मंदिर समिती आमगाव खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने ...
कीर्तनातून समाजजागृती : पुंडलिक महाराज जयंती कार्यक्रम
सोनपुरी : त्रिपुर सुंदरी गडमाता मंदिर समिती आमगाव खुर्द, श्री सत्संग विठ्ठल रुख्मिणी मंदिर समिती व श्री सत्संग लहरी महाराज मंदिर समिती आमगाव खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिपुर सुंदरी गडमातादेवी, विठ्ठल रुखमाई देवस्थान आमगाव खुर्द येथे पुंडलिक जयंती, तनपुरे महाराज जयंती, नरहरी महाराज पुण्यतिथी व पर्यावरण ज्ञान मंजुषा सत्कार व बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ब्रम्हज्योत प्रज्वलित करुन करण्यात आली. कार्यक्रमात हभप खोटेले महाराज यांनी हरिपाठ, सामुदायिक प्रार्थना सादर केले. हभप रुखनलाल बिसेन यांनी कीर्तन सादर केले. कार्यक्रमात कीर्तनाच्या माध्यमातून समाजजागृती करण्यात आली. तसेच भक्तीमार्गाने आत्मशांती मिळते, असे सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी दहिहांडी पूजन, गोपालकाला व सत्कार कार्यक्रम घेण्यात आले आणि शिवाजी जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम विठ्ठल रुखमाई देवस्थानमध्ये माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य लखनलाल अग्रवाल होते. बक्षीस वितरक म्हणून जि.प. सदस्य सुरेश हर्षे, सालेकसाचे तहसीलदार प्रशांत सांगळे, आमगाव खुर्दचे सरपंच योगेश राऊत, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष वासुदेव चुटे, सोनार समाज गोंदियाचे अध्यक्ष सुनील भज्जे, कुंदन बहेकार, सोनार समाजाचे महासचिव मधुकर कावडे, ब्रजभूषण बैस, यादवराव गौतम, हिवराज कावळे, भुजाडे, मुरलीधर करडे, धोटू राऊत, गुणवंत बिसेन, गौरीशंकर बिसेन, राजकुमार बसोने, टी.आर. लिल्हारे, मुरलीधर कावडे, ओमप्रकाश भास्कर, वनरक्षक एफ.सी. शेंडे, गिरोलाचे सरपंच राधिका वडगाये, पार्बता नेवारे, पुरुषोत्तम बागडे, परसराम मोटघरे उपस्थित होते.
कार्यक्रमात जि.प. सदस्य सुरेश हर्षे यांनी समाजजागृती कीर्तनाच्या माध्यमातून करता येते. त्यासाठी आपण योग्य ती मदत करण्यात सदैव तत्पर आहोत, असे म्हटले. त्यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. याप्रसंगी लखनलाल अग्रवाल, ब्रजभूषण बैस, राजकुमार बसोने, तहसीलदार प्रशांत सांगळे, सुनील भज्जे यांनी समयोचित विचार व्यक्त केले. या वेळी वनविभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या पर्यावरण ज्ञान मंजुषा परीक्षेचे पुरस्कार वितरण करण्यात आले व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आले. पर्यावरण ज्ञान मंजुषा परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना अतिथींच्या हस्ते पर्यावरण जाणीव जागृतीपर पुस्तके, इंग्रजी स्पिकिंग कोर्स, इंग्रजी ग्रामर, सामान्य ज्ञान, इंग्रजी डिक्सनरी देण्यात आली. वनविभागाच्या वतीने वनरक्षक एस.सी. शेंडे यांच्या सौजन्याने विविध शाळेत पर्यावरण ज्ञान मंजुषा परीक्षा घेण्यात आली होती.
कार्यक्रमात पाणलोट कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरीशंकर बिसेन, पर्यावरण संतुलन जनजागृतीसाठी उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल कहाली शाळेचे पदवीधर शिक्षक राजकुमार बसोने, सरपंच राधिका वडगाये व इतर मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पर्यावरण पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
प्रास्ताविक वासुदेव चुटे यांनी मांडले. संचालन राकेश रोकडे यांनी केले. आभार एफ.सी. शेंडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी त्रिपुर सुंदरी गडमाता मंदिर समिती आमगाव खुर्द, श्री सतसंग विठ्ठल रुख्मिनी मंदिर समिती, श्री सतसंग नरहरी महाराज मंदिर समिती आणि क्षेत्रीय ग्रामवासी आमगाव खुर्द यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)