मार्चपर्यंत एस्कलेटरची सोय
By admin | Published: September 7, 2016 12:23 AM2016-09-07T00:23:44+5:302016-09-07T00:24:51+5:30
गोंदिया रेल्वे स्थानकावर एयरपोर्टसारखी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थानकावर
नाना पटोले : ज्येष्ठ व दिव्यांगांसाठी रेल्वे स्थानकावर बॅटरीवरील कारचा शुभारंभ
गोंदिया : गोंदिया रेल्वे स्थानकावर एयरपोर्टसारखी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थानकावर एस्कलेटरचे (स्वयंचलित पायऱ्या) बांधकाम सुरू आहे. परंतु कंत्राटदाराने सदर काम सोडल्यामुळे बांधकामास विलंब होत आहे. तरीसुद्धा हे काम मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केला.
गोंदिया रेल्वे स्थानकावर वरिष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या सुविधेसाठी जनता सहकारी बँकेकडून नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आलेल्या बॅटरीवरील कारचे लोकार्पण खा.पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.राधेश्याम अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक अमित अग्रवाल, रेल्वे समितीचे ज्येष्ठ सदस्य रमन मेठी, रेल्वेचे डीसीएम अर्जुन सिब्बल, स्थानक व्यवस्थापक एच.ए. चौधरी, बँकेचे मुख्य व्यवस्थापक उमेश जोशी, न.प. सभापती बंटी पंचबुद्धे, भाजप शहर अध्यक्ष सुनील केलनका, नीलम हलमारे आदी उपस्थित होते.
जनता सहकारी बँकेकडून सदर बॅटरीवरील कार रेल्वे स्थानाकाला नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आली. सदर कारद्वारे वरिष्ठ नागरिक व दिव्यांग यांना प्लॅटफार्म क्रमांक ३ व ४ वर पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. दोन चालक व कारसाठी येणारा खर्च बँकेकडून उचलण्यात येणार आहे.
यावेळी खा.पटोले पुढे म्हणाले, गोंदिया ते जबलपूर रेल्वे लाईन सन २०१८ च्या शेवटपर्यंत प्रवासी सेवेसाठी उपलब्ध होईल. त्यामुळे गोंदिया रेल्वे स्थानकाचे महत्व वाढेल व गोंदियावरून जबलपूरसाठी ३५० किमी कमी अंतराने दरदिवशी ५० ते ६० रेल्वेगाड्यांची वाहतूक गोंदिया स्थानकातून सुरू होईल. उत्तर भारताला दक्षिण भारताशी रेल्वे लाईनच्या माध्यमाने जोडले जाईल. भीषण उन्हाळ्याच्या दिवसांत प्रवाशांना थंड पाणी पाजणारे शहर म्हणून गोंदियाची प्रसिद्धी दूरदूरपर्यंत पसरली आहे. ही प्रसिद्धी समाजसेवेच्या माध्यमाने आणखी वाढेल, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन जनता बँकेचे संचालक दिनेश दादरीवाल यांनी तर आभार उमेश जोशी यांनी मानले. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने बँक संचालक, बँक कर्मचारी, रेल्वे अधिकारी व शहरातील नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)