आॅगस्टमध्ये एस्केलेटर सुरु

By admin | Published: July 14, 2017 01:07 AM2017-07-14T01:07:45+5:302017-07-14T01:07:45+5:30

दिवसेंदिवस अत्याधुनिक होत असलेल्या व दपूम रेल्वे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या गोंदिया रेल्वे स्थानकाच्या विकासात भरच पडत आहे.

Escalator launches in August | आॅगस्टमध्ये एस्केलेटर सुरु

आॅगस्टमध्ये एस्केलेटर सुरु

Next

कायापालट रेल्वेस्थानकाचा : सर्वच प्लॅटफॉर्मवर लागणार स्वयंचलित पायऱ्या
देवानंद शहारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
दिवसेंदिवस अत्याधुनिक होत असलेल्या व दपूम रेल्वे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या गोंदिया रेल्वे स्थानकाच्या विकासात भरच पडत आहे. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी लिफ्टची सुविधा झाल्यानंतर आता एस्केलेटरचे कामही अंतिम टप्प्यात आहे. हे काम लवकरच पूर्णत्वास जाणार असून येत्या आॅगस्ट महिन्यात प्रवाशांना एस्कलेटरचा लाभ मिळणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.
मागील तीन वर्षांपूर्वी गोंदिया रेल्वे स्थानकावर काही अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जातील, अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार होमप्लॅटफॉर्मवर विस्तीर्ण असे शेड उभारण्यात आले. त्यानंतर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सोय करण्यात आली. तसेच त्यांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर ये-जा करण्यासाठी नि:शुल्क वाहन पुरविण्यात आले. प्रवाशांच्या लहान मुलांना खेळण्या-बागण्यासाठी किड्स झोनही तयार करण्यात आले. तसेच तिकीट काऊंटरवर प्रवाशांची गर्दी बघता क्वॉईन आॅपरेटेड व व्हाऊचर आॅपरेटेड तिकीट व्हेंडर मशीन्ससुद्धा सुरू करण्यात आल्या. आता वाताणुकूलित प्रतीक्षालयाचे कामसुद्धा होणार आहे. मात्र एस्कलेटरची सुविधा मिळण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच नेमका त्याच कामाला विलंब होत होता.
एस्कलेटरचे यंत्र व सर्व तांत्रिक साहित्य रेल्वे स्थानकात आधीच उपलब्ध झाले आहे. ते यंत्र बसविण्यासाठी असलेल्या जागेवर तसे बांधकामही करण्यात आले आहे. तसेच त्यासाठी काही जागा येत्या पाच दिवसांत मोकळी करून देण्याबाबतचे पत्रही प्रशासनाकडून गोंदिया रेल्वे स्थानकाला १२ जुलै २०१७ रोजी प्राप्त झाले आहे. जवळपास सर्वच तयारी पूर्ण झालेली असून केवळ यंत्र बसविणे बाकी आहे. पुढील पाच दिवसानंतर एस्कलेटरचे यंत्र बसविण्याच्या कामास सुरूवात होणार आहे. या कामाला १० ते १५ दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत एस्केलेटरचे काम परिपूर्ण होऊन केवळ उद्घाटन व लोकार्पणासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आॅगस्ट महिन्यामध्ये लोकप्रतिनिधींच्या हस्ते सदर सुविधेचे लोकार्पण होण्याची शक्यता रेल्वेच्या सूत्रांनी वर्तविली आहे. याशिवाय गोंदिया रेल्वे स्थानकाच्या सर्वच फलाटांवर एस्केलेटरची सुविधा भविष्यात होणार असून तशी मंजुरीसुद्धा असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले आहे.

Web Title: Escalator launches in August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.