एस्कलेटरचे काम प्रलंबितच
By admin | Published: July 6, 2017 02:02 AM2017-07-06T02:02:15+5:302017-07-06T02:02:15+5:30
येथील रेल्वे स्थानकावर बहुप्रतीक्षित एस्कलेटरचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही.
साहित्य फलाटावर : प्लॅटफॉर्म-५ वर शेडचे काम
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील रेल्वे स्थानकावर बहुप्रतीक्षित एस्कलेटरचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. त्यासाठी काही साहित्य रेल्वेला उपलब्ध झाले असून ते फलाटावरच पडून असल्याचे दिसून येते.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर ते बिलासपूर रेल्वे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न देणारे रेल्वे स्थानक म्हणून गोंदियाची ओळख आहे. मात्र आवश्यक असणाऱ्या अत्याधुनिक सुविधा या स्थानकावर नव्हत्या. त्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ होत होती. वृद्ध व अपंगांची खूपच हेळसांड होत होती. येथे स्वयंचलित पायऱ्या (एस्कलेटर) व लिफ्टची सोय करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. यावर्षी लिफ्टची सुविधा तर करण्यात आली, मात्र अद्यापही एस्कलेटर व्यवस्था होवू शकली नाही.
महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या प्रवाशांना गोंदिया रेल्वे स्थानकातूनच इतरत्र ये-जा करावी लागते. दररोज ६० पेक्षा अधिक प्रवाशी गाड्या या स्थानकातून धावतात. दररोज जवळपास २० हजार प्रवाशी येथे उतरतात व एवढेच प्रवाशी गाड्यांमध्ये चढतात. या स्थानकाचे विस्तारीकरण करण्यात आले. तीनऐवजी आता सात फलाटांवरून गाड्या धावतात. परंतु येथील तांत्रिक विकास व फलाटांचे सौंदर्यीकरण बाकीच आहे. प्लॅटफॉर्म-२ ची लांबी वाढविण्याचे कार्य सुरूच असून या फलाटाला होमप्लॅटफॉर्मएवढे लांब करण्यात येत आहे. तर प्लॅटफॉर्म-५ वर शेडचे कामही सुरू आहे.
गोंदिया स्थानकातील होम प्लॅटफॉर्मसह तीन व चार क्रमांकाच्या फलाटांवर स्वयंचलित पायऱ्यांची सोय करण्यात येणार आहे. लिफ्टचा शुभारंभ झाला, पण एस्कलेटरचे कार्य रखडले आहे. याबाबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, सन २०१७ मध्येच एस्कलेटरचा लाभ प्रवाशांना मिळेल, असे सांगण्यात आले आहे. मात्र त्याचा निश्चित कालावधी ते सांगू शकले नाही.