ईटीआय मशीनचा बस वाहकांना होतोय मनस्ताप! कारवाईच्या भीतीने वाढतोय ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:29 AM2021-03-05T04:29:32+5:302021-03-05T04:29:32+5:30

गोंदिया : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटीला अधिक स्मार्ट करीत आणि प्रवाशांना सुविधा देण्यासाठी अनेक बदल केले आहेत. तिकिटांच्या ...

ETI machine bus carriers are getting annoyed! Rising fever for fear of action | ईटीआय मशीनचा बस वाहकांना होतोय मनस्ताप! कारवाईच्या भीतीने वाढतोय ताप

ईटीआय मशीनचा बस वाहकांना होतोय मनस्ताप! कारवाईच्या भीतीने वाढतोय ताप

Next

गोंदिया : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटीला अधिक स्मार्ट करीत आणि प्रवाशांना सुविधा देण्यासाठी अनेक बदल केले आहेत. तिकिटांच्या घोळाला प्रतिबंध लावण्यासाठी आणि यात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी वाहकांना तिकिटांच्या ट्रे-ऐवजी ईटीआय मशीन दिल्या आहेत. मात्र या ईटीआय मशीन इलेक्ट्रॉनिकच्या असल्याने त्यात अनेकदा बिघाड होतो, तर कधी प्रवासादरम्यानच चार्जिंग संपते. त्यामुळे अशावेळेस प्रवाशांना तिकीट देताना वाहकाची फारच तारांबळ होते. गोंदिया आगारात एकूण १०२ वाहक असून, १३३ ईटीआय मशीन आहेत. मात्र ईटीआय मशीनमध्ये बिघाड येण्याच्या तक्रारीत अलीकडे फारच वाढ झाली आहे. गोंदिया आगारातसुध्दा दररोज चार पाच ईटीआय मशीन बंद पडण्याच्या तक्रारी येतात, तर वर्षाकाठी येणाऱ्या तक्रारींची संख्या ७१० च्यावर आहे. या प्रकारामुळे मात्र वाहकांना अनेकदा मनस्ताप होतो, तर बऱ्याचवेळा कारवाई होण्याचीसुध्दा त्यांना भीती असल्यामुळे त्यांना याचा बराच ताप सहन करावा लागतो.

.........

दररोज बिघडतात चार ते पाच मशीन

ईटीआय मशीन या इलेक्ट्रॉनिक आहेत. त्यामुळे त्यात बऱ्याच समस्या येत असतात. सर्वाधिक समस्या ही चार्जिंगची येते. एकदा ही मशीन चार्ज केल्यानंतर पाच ते सहा तास चालते. ईटीआय मशीन बंद पडल्याच्या दररोज गोंदिया आगाराकडे चार ते पाच तक्रारी येत असल्याचे आगार व्यवस्थापकांनी सांगितले.

...............

वर्षभरात ७१० तक्रारी

- गोंदिया आगाराकडे एकूण १३३ ईटीआय मशीन आहेत. गेल्या वर्षभरात ईटीआय मशीन बंद पडल्याच्या ७१० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

- ईटीआय मशीन बंद पडल्यानंतर ती दुरुस्तीसाठी नागपूर येथे पाठविली जाते, तर मशीनमध्ये जास्तच समस्या असल्यास ही मशीन मुंबई येथे दुरुस्तीसाठी पाठविली जाते. मात्र मशीन दुरुस्ती करण्यासाठी पाठविल्यानंतर ती दुरुस्त होऊन येण्यास बराच कालावधी लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

- ईटीआय मशीन लवकरच चार्ज करण्यासाठी आता गँग चार्जरचा सर्व आगारांना पुरवठा करण्यात आला. यामुळे एकाचवेळी १५ मशीन चार्ज करता येते. पूर्वी हे चार्जर नसल्याने समस्या येत होती.

..........

वाहक काय म्हणतात

महामंडळाने सोयीच्या दृष्टीने ईटीआय मशीन दिल्या आहेत. मात्र त्या इलेक्ट्राॅनिक्स असल्याने अनेकदा त्यात समस्या येते. बऱ्याच मशीनची बटणे ऑपरेट होत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना तिकीट देण्यास विलंब होतो; तर बसमध्ये गर्दी असल्यास आणि मशीनमध्ये बिघाड आल्यास मोठा मनस्ताप होतो.

- अरुण सरकंडे, वाहक

..........

ईटीआय मशीनमध्ये बऱ्याच त्रुटी आहेत. यात चार्जिंगची मोठी समस्या आहे. आता गोंदिया आगारात गँगचार्जर मशीनची सुविधा उपलब्ध झाल्याने ही अडचण थोडी दूर झाली आहे. मात्र बऱ्याचदा ही मशीन वेळेवर बंद पडत असल्याने समस्या येते, तर कधी यामुळे आपल्यावर कारवाई तर होणार नाही, अशी भीतीसुध्दा वाटत असते.

- सुभाष राठोड, वाहक

........

कोट

ईटीआय मशीनसंदर्भातील तक्रारींमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. आगाराकडे दररोज चार ते पाच मशीनमध्ये बिघाड आल्याच्या तक्रारी प्राप्त होतात. बिघाड झालेल्या मशीन दुरुस्तीसाठी नागपूर आणि मुंबई येथे दुरुस्तीसाठी पाठविल्या जातात.

- संजना पटले, आगार व्यवस्थापक

....................

ईटीआय मशीनला ट्रेचा पर्याय

ईटीआय मशीन या इलेक्ट्राॅनिक्स आहेत. त्यामुळे त्या कधीही पडू शकतात. मात्र यामुळे समस्या निर्माण होऊ नये याकरिता तिकीट ट्रेसुध्दा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट देण्यास कुठलीच अडचण येत नसल्याने आगार व्यवस्थापकांनी सांगितले.

................

जिल्ह्यातील आगारांची संख्या : ०२

एकूण एसटी बसेसची संख्या : १२०

वाहकांची संख्या : १३३

.....................

Web Title: ETI machine bus carriers are getting annoyed! Rising fever for fear of action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.